पुणे, 24 डिसेंबर : जम्बो कोविड रुग्णालयात एका नर्सला मारहाण प्रकरणी 8 बाऊन्सर यांना अखेर निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साधारण 4 च्या सुमारास पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात गेटवर नर्सला काही जणांकडून मारहाण झाल्याचे वृत्त उघडकीस आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात पगार घेण्यासाठी आलेल्या नर्सेस व ब्रदर्स यांना येथील बाऊन्सरकडून मारहाण झाली होती. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मेट ब्रो या खासगी एजन्सीकडे जम्बो कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंत्राटी बाऊन्सरच्या गुंडगिरीमुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा बदनाम झालं आहे. नर्सेस आणि बाऊन्सरच्या वादात जम्बो कोविड रुग्णालयाच्या गेटवरच मारहाण सुरू झाली होती. अखेर व्यवस्थापनाने यावर कारवाई करीत त्या आठही बाऊन्सर यांना निलंबित केलं आहे.
दरम्यान पुण्यात Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे 9 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच शाळा उघडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पुण्यात काही शाळा सुरूही झाल्या होत्या, पण पुन्हा एकदा पुणे परिसरात कोरोना रुग्ण (Covid-19) वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. आता येत्या 4 जानेवारीपासून शाळा ठराविक इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधांचं पालन करून उघडणार आहेत. या संदर्भातले सुधारित आदेश महापालिकेने काढले आहेत.