Home /News /pune /

पुणे जिल्ह्यात महिलेचे डोळे निकामी करणारा आरोपी जेरबंद, अटकेनंतर केला अजब दावा

पुणे जिल्ह्यात महिलेचे डोळे निकामी करणारा आरोपी जेरबंद, अटकेनंतर केला अजब दावा

आरोपी मूळचा बारामती तालुक्यातील उंडवडी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

पुणे, 9 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे शौचास गेलेल्या महिलेचे डोळे जखमी करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केला आहे. कुंडलीक बगाडे असं या प्रकरणातील नराधम आरोपीचं नाव आहे. आरोपी मूळचा बारामती तालुक्यातील उंडवडी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. न्हावरे येथे 3 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. महिला घराच्या बाजूला शौचास गेली असता तिच्यावर आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले होते. महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत आरोपीला आज बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर आरोपीने अजब दावा केला आहे. 'महिलेनं शिवीगाळ केल्यानं रागाच्या भरात हल्ला केला,' असं आरोपीचं म्हणणं आहे. मात्र महिलेचे डोळे निकामी करत तिच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या या आरोपीविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. कशी फिरली तपासाची चक्र? सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने विषेश पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे शीरूर, शिक्रापूर, भिगवण, यवत, बारामती तालुका, दौंड, इंदापूर या विविध पो.स्टे.चे पथक गुन्हयाचे तपासकामी बोलावून घेवून विभागणी करून जबाबदारी दिलेली होती. गुन्हा घडल्यानंतर राजे कॉम्प्लेक्स परिसराच्या समोरील बाजूस असणाऱ्या चायनिज सेंटरमध्ये काम करणारा वेटर याने दाढी व डोक्याचे केस काढलेले आहेत, तसंच त्याचे वर्णन गुन्ह्यातील पीडीतेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जुळत आहे. तो कोठेतरी निघून गेला आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर लगेच पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संशयित इसमाचा शोध घेण्याकरीता तपास पथक तयार करून रवाना केलं. त्याप्रमाणे टीमने संशयित इसमाचा वावर असणाऱ्या परिसरात सी.सी.टी.व्ही.फुटेजची पाहणी करून सी.सी.टी.व्ही. फुटेज हस्तगत केले व फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपीबाबत माहिती 'संशयित इसमाचा स्वभाव हा रागीट आहे, तो नेहमी दारूच्या नषेत धुंद असतो, भगव्या रंगाचा मफलर वापरतो, नेहमी कोणाशीही कोणत्याही कारणावरून वाद घालतो, त्याच्या हातात शंकराची पिंड असून त्यावर नागाच्या फण्याचा आकार आहे, भीक मागत फिरतो, मुका असल्याचे ढोंग करतो,' अशी माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अखंडीतपणे आरोपीचा शोध घेतला असता त्याचे नाव कुंडलीक साहेबराव बगाडे,( रा. उंडवडे सुपे, ता. बारामती, जि. पुणे) असे असल्याचे समजले व त्याचा वावर हा श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील विविध गावात असल्याची माहिती समजली. त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत व पोलीस खबऱ्यांमार्फत श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रत्येक गावात सोशल माध्यमात संदेशाद्वारे संशयिताची माहिती व्हायरल करीत त्याच्या जाण्याचे मार्ग शोधून काढले. आरोपीची संभाव्य ठिकाणे पाहून त्या ठिकाणी संशयिताचा शोध घेण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीनी दिलेली फिर्याद व जखमीने दिलेला जबाब यामध्ये केवळ आरेापीचे वर्णन व त्यांच्या अंगावर असलेला लाल रंगाचा पंचा एवढ्या मर्यादित माहितीवरून तैनात केलेल्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीला शोधून काढलं.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime news

पुढील बातम्या