पुणे, 11 जानेवारी : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात (PUNE) भीषण अपघाताच्या घटना समोर आली आहे. भुमकर पुलाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या मार्गावर कंटेनर आणि टेम्पो उलटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर भुमकर पुलाजवळ आज पहाटेच्या सुमारास विचित्र अपघाताची मालिका घडली आहे. महामार्गावर एकापाठोपाठ ट्रक, टेम्पो आणि कंटेरनरला भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महामार्गाच्या बाजूला एक टेम्पो आणि कंटेनर उलटल्याचे दिसून येत आहे. तर पुढे काही अंतरावर एका ट्रकने धडक दिली आहे. यात ट्रकच्या समोरील भागाचा पार चुराडा झाला आहे.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली जात आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 5 ते 7 जण जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर नवा कात्रज बोगदा सोडल्यानंतर थेट आंबेगाव पर्यंत तीव्र उताराचा रस्ता असल्याने या रस्त्यावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले आहे. अनेकांचे जीव गेलेत मात्र तरीही महामार्गावरच्या या पट्ट्यात नॅशनल हायवे अथोरिटी कडून कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा उपाय योजना केल्या जात नाहीत. अनेकदा तीव्र उतार असल्याने या परिसरात ट्रकचे ब्रेक फेल होऊन मोठे अपघात घडले आहेत.
आजही सकाळपासून याच परिसरात दोन अपघात घडले आहेत. यात तीन जणांचा जीव गेला तर सात जण गंभीर जखमी आहेत. स्थानिक नागरिकांकडून अनेकदा याठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी झाली मात्र. नॅशनल हायवे अथोरिटीकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर बसला अपघात 1 ठार
तर मुंबई बंगळुरू महामार्गावर उदगीर (लातूर )वरून मुंबईकडे जाणाऱ्या वनिता ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने पहाटे चार वाजेच्या सुमारास किवळे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील एकूण 49 प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय तसेच देहुरोड आधार हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.