पुण्यात मुकादमाच्या घरी सापडलं घबाड, रात्रभर नोटा मोजत होतं एसीबी पथक

पुण्यात मुकादमाच्या घरी सापडलं घबाड, रात्रभर नोटा मोजत होतं एसीबी पथक

आरोपीची दोन लग्नं झाली असून एक पत्नी 10 बाय 10 च्या खोलीत राहते तर दुसरी लाडकी पत्नी बंगल्यात राहते. याच बंगल्यात पोलिसांना ही रक्कम पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली.

  • Share this:

पुणे,20 जानेवारी: फुटपाथवरच्या नारळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घरी तब्बल 36 लाख रुपयांचं घबाड सापडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या मुरादमाच्या घरी शनिवारी छापा टाकला. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम सुनील शर्मा आणि मदतनीस गोपी उबाळे या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रभर नोटा मोजत बसले पथक

या कारवाईत एसीबीच्या तपास पथकाला तब्बल 36 लाख रूपयांची रोकड आणि आठ तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत. मुकादमाच्या घरी एवढी मोठी रक्कम पाहून एसीबीचे अधिकारीही थक्क झाले. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. पथकातील अधिकारी नोटा मोजत बसले होते.

मिळालेली माहिती अशी की, सुनील शर्मा हा पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम पदावर कार्यरत आहे. तर उबाळे हा त्याची बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मुकादमाने पाचशे रुपयांची लाच घेतली होती. एसीबीने या प्रकरणी दखल घेऊन शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने आढळून आले. पाचशे रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकादमाकडे मोठी रोकड मिळेल, असा अंदाज एसीबीच्या तपासपथकालाही नव्हता. त्यामुळे या पथकाला रात्र जागून काढावी लागली. याठिकाणी 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले. दागिने आणि रोकड जप्त करून ते येरवडा पोलिस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलिसही आवक झाले आहेत. शर्मा याची दोन लग्नं झाली असून एक पत्नी 10 बाय 10 च्या खोलीत राहते तर दुसरी लाडकी पत्नी बंगल्यात राहते. याच बंगल्यात पोलिसांना ही रक्कम पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली.

First published: January 20, 2020, 6:19 PM IST

ताज्या बातम्या