पुणे, 24 नोव्हेंबर : पुण्यातील प्रसिद्ध ऑटोमोबाइल उद्योजक गौतम पाषाणकर अखेर पुणे पोलिसांना सापडले आहेत. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये पुणे पोलिसांना आढळून आले आहेत. आर्थिक विवंचनेतून ते बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलिसात दाखल झाली होती. तेव्हापासून पुणे पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली होती.
निघून जाण्याआधी उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोटही लिहली होती. मात्र त्यानंतर ते पुण्यातून थेट जयपूरपर्यंत पोहोचले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यातील जयपूर येथून त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते.
गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्या 21 ऑक्टोबरपासून ते बेपत्ता होते. व्यवसायात नुकसान झाल्याच्या कारणावरून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ते निघून गेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करण्यात आली होती. पोलिसांची पाच पथकं त्यांचा कसून शोध घेत होती.
दरम्यानच्या काळात ते कोल्हापुरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. असं असताना महिना उलटला तरी पाषाणकर यांचा तपास लागलेला नव्हता. त्यातच त्यांच्या बेपत्ता होण्यामागे एक बडा राजकीय नेता कारणीभूत असल्याची शक्यता त्यांचा मुलगा कपिल यांनी एका तक्रारीद्वारे व्यक्त केली होती.
पाषाणकर यांच्या मुलाच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागल होतं. अखेर आज पाषाणकर यांचा ठावठिकाणा मिळाला आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व शंकांचं लवकरच निरसन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.