पुणे, 22 मे: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा मोठी कसरत करत आहेत. याबाबत त्यांच्यावर सर्वदूर कौतुकाचा वर्षावही करण्यात येत आहे. मात्र अशातच आपल्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणणारी एक घटना पुण्यातील शुक्रवार पेठेत घडली आहे.
पुण्यातल्या शुक्रवार पेठेत रतन सायकल मार्ट जवळ एका अज्ञात व्यक्तीचा गेल्या तीन तासांहून अधिक काळ लोटला तरी तसाच पडून आहे. यंत्रणांना वारंवार कळवल्यानंतरही तीन अॅम्ब्युलन्स येऊन गेल्या. मात्र प्रोटोकॉलचं कारण पुढे करत कुणीही मृतदेहाला हात लावलेला नाही. मृतदेह नेण्यासाठी शववाहिका यावी लागेल, असं कारण देण्यात येत आहे.
एकीकडे, कोरोनाबाबत पुण्यातील परिस्थिती बिकट होत असताना ही बाब समोर आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवार पेठेत रस्त्यावर असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र जर त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा होवून त्याचा जीव गेला असेल तर इतरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यापुढे शहरात असे प्रकार होवू नयेत, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्हयात 5 हजार 14 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आधीच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 297 ने वाढ झाली आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.