पुणे, 19 जानेवारी : भेळ हा अनेकांना आवडणारा प्रकार आहे. फास्ट फुडच्या सध्या जमान्यात भेळीचे अनेक प्रकार आहेत. पुणे शहरात एक नावाजलेली भेळ आहे. या भेळीला नाव नाही पण त्याची विक्री करणारे आजी-आजोबा मात्र प्रसिद्ध आहेत. शनिवार पेठेतील आजी-आजोबांची भेळ म्हणून ही भेळ प्रसिद्ध आहे. शनिवार पेठेच्या हुजुरपागा शाळेच्या शेजारच्या गल्लीमध्ये रोज संध्याकाळी हे आजी -आजोबा गेल्या 25 वर्षांपासून भेळ विकतात.
विठ्ठल जाधव असं या आजोबांच नाव आहे. शनिवार पेठ येथील हुजूरपागा शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हे आजोबा त्यांच्या पत्नीसह भेळ विक्री करतात. धनकवडीहून गेली 25 वर्ष भेळ विक्रीसाठी इथं येतात. त्यांचा छोटासा भेळेचा गाडा आहे. त्याच्यावर मोजून तीन ते चार डब्यांमध्ये भेळीचं साहित्य असतं. ते मोजकं साहित्य वापरून अतिशय चविष्ट अशी भेळ ते बनवतात.
Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!
काय आहे खासियत?
जाधव आजोबांनी या भेळीबद्दलची माहिती सांगितली. 'मी इथं मटकी भेळ बनवतो. पुण्यात विविध ठिकाणी मटकी भेळ मिळते. पण, आमच्या भेळची खासियत म्हणजे आम्ही या भेळमध्ये घरी तयार केलेले पातळ पोह्याचा चिवडा वापरतो. त्याचबरोबर घरी बनवलेलं मिरची आणि लिंबाचं लोणंचंही यामध्ये असतं. या लोणच्याची चव भेळीमध्ये उतरते. त्यामुळे ती अधिक चविष्ट लागते. या लोणच्याची सिक्रेट रेसिपी असून त्याच्या जोरावर गेल्या 25 वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत.'
माझ्या घरामध्ये मी, माझी बायको आणि मुलगा असून भेळीच्या व्यवसायातील आमचा उदरनिर्वाह सध्या सुरू आहे. चाळीस रुपयाला ही भेळ उपलब्ध असून रोज 50 प्लेट तरी भेळीची विक्री होते,' अशी माहिती जाधव यांनी दिली.
जाधव आजोबांची भेळ या परिसरात चांगलीच फेमस आहे. त्यामुळे इथं गेल्या कित्येक वर्षांपासून गिऱ्हाईक नियमितपणे येतात. 'आम्ही गेल्या 25 वर्षांपासून इथं भेळ खाण्यासाठी येत आहोत. यापूर्वी आजोबांचे वडिल हा व्यवसाय करत. आता आजोबांनी तो सुरू ठेवला आहे. आम्ही तेव्हापासून ही भेळ खात आहोत. त्याची चव आजही अबाधित आहे. या भेळीतलं लोणचं हे अतिशय चविष्ट आहे. ते कमी तिखटाचं असल्यानं लहान मुलं देखील ते खाऊ शकतात,' असं येथील नियमित गिऱ्हाईक किशोर धनकवडे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Local18, Local18 food, Pune