मान्सूनपूर्वीच पुण्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध; 7 वर्षातील सर्वाधिक साठा

मान्सूनपूर्वीच पुण्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध; 7 वर्षातील सर्वाधिक साठा

Pune News: यावर्षी मान्सूनपूर्वीच पुण्यातील बहुतांशी धरणांत (Dam in Pune) मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून 7.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

  • Share this:

पुणे, 04 जून: काही तासांपूर्वीच केरळात मान्सून (Monsoon in Kerala) दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता खूप कमी आहे. यावर्षी मान्सूनला थोडासा उशीर झाला असला तरी, पुण्यातील बहुतांशी धरणांत (Dam in Pune) मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून 7.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

खरंतर, सर्वसाधारण मान्सून पाऊस सक्रीय होण्यापूर्वी संबंधित धरणांत इतका पाणीसाठा उपलब्ध नसतो, असं निरीक्षण जलसंपदा विभागानं नोंदवलं आहे. गेल्या सात वर्षांच्या तुलनेत मान्सूनपूर्वी इतका पाणीसाठी कधीही उपलब्ध नव्हता. तौत्के आणि यास चक्रीवादळामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या या चारही धरणांत तब्बल 7.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

अलीकडेच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या सुधारित अंदाजनुसार, देशात यावर्षी 101 टक्के इतका पाऊस पडणार असल्याची सुधारित माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी धरणं रिकामी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. एकीकडे धरणं रिकामी करण्याचा सल्ला दिला असताना, 3 जूनपर्यंत टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांत पावणे आठ टीएमसी पाणी साठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाचा कल लक्षात घेता, हा पाणीसाठी रिकामा करण्याची गरज आहे.

हे ही वाचा-Weather : राज्यात मान्सूनपूर्व बरसण्यास सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस

मागील दोन वर्षात मान्सून लांबणीवर पडला होता. तसेच राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे या चारही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: News18 Desk
First published: June 4, 2021, 11:54 AM IST

ताज्या बातम्या