पुण्यात अतिवृष्टीमुळे कहर, बटाटा पिकाचे 400 कोटींचे नुकसान, सेनेच्या नेत्यांची सरकारकडे मागणी

पुण्यात अतिवृष्टीमुळे कहर, बटाटा पिकाचे 400 कोटींचे नुकसान, सेनेच्या नेत्यांची सरकारकडे मागणी

सातगाव पठारासह खेड तालुक्यातील, गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात बटाटा पिकाचे नुकसान झाले आहे.

  • Share this:

पुणे, 22 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात हजारो हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात मुख्यत्वे बटाटा पीक घेतले जाते. बटाटा लागवड क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे काढणीस आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे तब्बल 400 कोटींचे नुकसान झाले आहे.

सातगाव पठारावरील पेठ, पारगाव तर्फे खेड, कारेगाव, थुगाव, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी आदी गावांतील जवळ जवळ 400 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील परिसराची शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां समवेत पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या.

सातगाव पठारासह खेड तालुक्यातील, गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात बटाटा पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तांना पत्रव्यवहार करून  तात्काळ पंचनामे करण्यासह योग्य मदतीसाठी झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर करण्याचा सूचना केल्या आहेत.

तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांनाही पत्रव्यवहार केला असून राज्य शासनाने या नुकसानीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्याची मागणी आढळराव पाटील यांनी केली आहे.

दरम्यान,  शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, खेड,आंबेगाव, शिरुर या तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत संततधार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कांदा, बटाटा अशी पिके हातची गेली आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुर्णतः कोलमडून गेले असून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या