31 SRPF जवानांना Coronaची लागण, केरळला निवडणूक बंदोबस्तासाठी गेले असता घडला प्रकार

31 SRPF जवानांना Coronaची लागण, केरळला निवडणूक बंदोबस्तासाठी गेले असता घडला प्रकार

या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा यापैकी 31 जवान चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व 31 जवानांवर सध्या दौंडमधील गट क्रमांक सात मध्ये उपचार सुरू आहेत.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 13 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. तसंच इतर राज्यांतही काहीशी तशीच स्थिती आहे. पण असं असलं तरी केरळसह पाच राज्यांत (Kerala Election 2021) गेल्या काही दिवसांत निवडणुकांची धूम पाहायला मिळाली. प्रचंड गर्दीच्या सभा याठिकाणी झाल्याचंही पाहायला मिळालं. मात्र या सर्वाचा फटका महाराष्ट्रातील जवानांना बसलाय. पुण्याच्या दौंडमधील राज्य राखीव दलाच्या 31 जवानांना कोरोनाची लागण (31 SRPF Jawan corona infected in kerala) झाली आहे. हे सर्व जवान निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी केरळला गेले होते.

(हे वाचा -उस्मानाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; बेडअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार)

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या घातक विषाणूचं थैमान पाहायला मिळत आहे. असं असतानाही पाच राज्यांतील निवडणुका मात्र चांगल्याच गाजल्या. सर्वच नेत्यांच्या भरगच्च गर्दीच्या सभा आणि भाषणं असं सर्वकाही नेहमीप्रमाणे होतं. याठिकाणी कोरोनाचा फैलाव का होत नाही, असा सवाल अनेकांकडून केलाही जात होता. मात्र त्यावर उत्तर कोण देणार. तर या ठिकाणी सर्वकाही आलबेल असताना महाराष्ट्राच्या जवानांना मात्र या सर्वाचा फटका बसलाय. राज्य राखीव पोलिस दलातील दौंड येथील गट क्रमांक सातच्या जवानांना केरळला निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पाठवण्यात आलं होतं. केरळच्या निवडणुकांची धामधूम शांत झाल्यानंतर हे सर्व जवान घरी परतले, मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.

(हे वाचा -नाशिकचं Remdesivir मालेगावकरांना, भुसेंच्या रुद्रावतारानंतर नाशिककरांमध्ये संताप )

दौंडच्या SRPF गट क्रमांक सातमधील जवान हे नुकतेच केरळच्या निवडणूक बंदोबस्ताच्या ड्युटीहून परतले होते. पण घरी आल्यानंतर तीन-चार दिवसांनी या जवानांना अंगदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळं या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा यापैकी 31 जवान चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व 31 जवानांवर सध्या दौंडमधील गट क्रमांक सात मध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या संसर्गाचा वेग पाहता दुसरी लाट अत्यंत धोकादायक असल्याचं जाणवत आहे. त्यात पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये कोरोनाच्या विषाणूला हवेसं वातावरण अनेक ठिकाणी भेटलं. त्यामुळं हा कोरोना आणखी किती जणांच्या घरी पाहुणचार घ्यायला गेला असणार हे सांगता येणं कठीण आहे. कारण जर बंदोबस्तातील जवानांना लागण झालेली असेल, तर मग गर्दीचं काय हा मोठा प्रश्न आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या