पुणे, 28 मे: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पररित्या विकून तब्बल 15 लाख 80 हजार रुपये लाटल्याप्रकरणी भाजपचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (Rajendra Landage) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नगरसेवक लांडगे याने संबंधित जमीन स्वतःच्या नावे नसताना, बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन विकली आहे. विशेष म्हणजे ज्यांना ही जमीन विकली आहे. त्यांना संबंधित कागदपत्रे बनावट असल्याची माहिती होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितलं की, आरोपी नगरसेवक लांडगे याने सर्व्हे क्रमांक 22 मधील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 936 चौरस फूट जागा विकली आहे. ही जागा स्वतः च्या मालकीची नसताना आरोपी नगरसेवकानं खोटे नोटराईज कागदपत्रे तयार करून ती जागा मनोज शर्मा आणि रविकांत ठाकूर नावाच्या व्यक्तींना विकली आहे.
याप्रकरणी आरोपीनं संबंधित खरेदीदाराकडून 15 लाख 80 हजार रुपये एवढी रक्कम लाटली आहे. याप्रकरणी नवनगर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याच्यासह जमीन विकत घेणारे मनोज महेंद्र शर्मा आणि रविकांत सुरेंद्र ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा-ईडीकडून वेरॉन ग्रुपची 166 कोटींची मालमत्ता जप्त
संबंधित जमीन प्राधिकरणाची असल्याचं माहीत असूनही त्यांनी ही जागा विकत घेऊन त्यावर बेकायदेशीर बांधकाम उभारलं आहे. त्यामुळे मनोज महेंद्र शर्मा आणि रविकांत सुरेंद्र ठाकूर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नगरसेवक लांडगे आणि शर्मा या दोघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी रविकांत ठाकूर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Money fraud