रायचंद शिंदे, प्रतिनिधी
जुन्नर, 19 मार्च : मागच्या काही वर्षात गडकिल्ले आणि घाटमाथ्यावर ट्रेकींग करण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र, अनेकदा अनुभव नसताना उत्साहाच्या केलेल्या चढाईमुळे काही अपघातही घडले आहेत. अशाच एका अपघातात नाशिक येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. माळशेज घाट परिसरात खुबी येथे ट्रेकिंगसाठी आलेले 15 जण दरीत अडकले होते. त्यांचं बचावकार्य राबवत असताना एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.
नाशिकचे 15 ट्रेकर्स माळशेज घाटातील दरीत अडकले#nashik #trekkers #MalshejGhat pic.twitter.com/3z3xCy3DOs
— News18Lokmat (@News18lokmat) March 19, 2023
काय आहे घटना?
याबाबत सविस्तर वृत्त असे की हे सर्व पर्यटक नाशिक येथून आज दुपारी माळशेज परिसरात पर्यटनास आले होते. मात्र, घाटात खाली उतरून गेल्यावर एका घळीत रस्ता चुकले. माघारी येताना चोरदरा घाट चढताना पाय घसरून तोल जाऊन एका अनुभवी पर्यटकाचा 350 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. दरम्यान शिवनेरी रेस्क्यू टीमकडून मार्ग चुकलेल्या पर्यटकांना अंधार पडायच्या आत रोपच्या सहाय्याने 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही.
नाशिक येथील ट्रेकिंगचा मोठा अनुभव असलेले ट्रेकर किरण काळे (वय 52) यांचा चोरदरा घाट चढताना घसरून मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच त्यांनी 100 ट्रेक पूर्ण केले होते. सोबत स्थानिक गाईड काशिनाथ हे होते. 13 जण अवघड ठिकाणी अडकून पडलेले होते. यात 2 महिला व एका लहान मुलाचा (वय 10-12) समावेश होता. दुपारपासून जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष डुकरे आणि सहकारी यांनी सर्वांना बाहेर काढले. सायंकाळी मुरबाड येथील दिपक विशे, खोपोली येथून गणेश गिध आणि पाठोपाठ नाशिकहून दयानंद कोळी व टीम सुद्धा माळशेज मध्ये पोहचली आहे. मात्र, अद्याप मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले नाही.
वाचा - बापानं आयुष्यभर कमवलेले पैसे, दागिने मुलीने एका झटक्यात चोरलं, काय आहे प्रकरण
यापूर्वी हरिश्चंद्रगड येथे अडकले होते 20 ट्रेकर्स
माळशेज घाट येथील हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी 20 जणांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या ठिकाणाहून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे 800 फूट खाली सर्व ट्रेकर अडकले होते. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित वाचवण्यात आले. हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी एकूण 30 जण गेले होते. हरिश्चंद्र गडावरुन खाली उतरताना कोकणकड्यापासून 800 फूट खाली यातील 17 जण अडकले. उर्वरीत ट्रेकर्स संध्याकाळीच खाली उतरले. ट्रेकर्स गडावरच अडकल्याने अंधारातून बचावकार्य करण्यास अडथळा आला. त्यामुळे रात्रभर ट्रेकर्सना तिथेच राहावं लागलं आहे.
ट्रेकींग करताय? सावधान!
गेल्या काही वर्षात ट्रेकींग करणे हा ट्रेंड झाला आहे. तुम्ही देखील सोशल मीडियावर आपल्याच मित्रमैत्रीणींचे ट्रेकींगला गेल्याचे फोटो पाहिले असतील. मात्र, ट्रेंकींग फोटोमध्ये जितकी थ्रिलिंग वाटते. त्यापेक्षा अधिक धोकादायक आहे. उत्साहाच्या भरात अनेकदा चुका होण्याची शक्यता असते. अगदी अनुभवी ट्रेकर्सचे अपघातात मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आपली क्षमता आणि धोका हे ओळखूनच हे धाडस करायला हवे, असं आवाहन अनुभवी ट्रेकर्स देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.