सुमित सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 16 जानेवारी : कोरोनाच्या (Corona)संकटाशी दोन हात करत असताना महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे (bird flu) संकट उभे ठाकले आहे. मुंबई, बीड, परभणी, दापोली पाठोपाठ आता पुण्यात (Pune) बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये मृत कोंबड्या या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरिबेल गावातील 10 कोंबड्या दगावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट हा आता समोर आला आहे. यात घरगुती कोंबड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बोरीबेल गावापासून एक किलोमीटर अंतरावरील पक्षी नष्ट करणार आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
जीवनशैलीत करा हे बदल, कोरोनाकाळात नक्की राहाल आनंंदी आणि फिट!
तर वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळले होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या आठही मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
'आता इच्छा नाहीये...' पंतप्रधानांनी सुरू केलेल्या लसीकरणाला महिला डॉक्टरचा नकार
काही दिवसांपूर्वी बोरगाव शिवारात मोर मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या चमूने तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोरांची पाहणी केली. मृत मोरांपैकी पक्ष्याचे नमुने नागपूरला पाठवण्यात आले असून तेथून पुण्यात पाठविण्यात आले. पुण्यात तपासणीनंतर मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात आले होते. आज या आठ मोरांचा अहवाल समोर आला आहे. यात बर्ड फ्ल्यूमुळे या मोरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरातील एक किलोमीटर परिसरात खबरदारी घेतली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.