आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं -संजय राऊत

आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं -संजय राऊत

उद्या जर मध्यावधी निवडणूक झाल्यातर सेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीये.

  • Share this:

09 जून : उद्या जर मध्यावधी निवडणूक झाल्यातर सेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीये. तसंच जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीतर फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत आज आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. ही सत्ता तोडकी मोडकी आणि अर्धवट आहे. महाराष्ट्र अस्थिर होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिलाय. पण ज्या प्रकारे हे सरकार वागतंय. त्यामुळे या सरकारला गुदमरून ठार मारायचं की नैसर्गिक मृत्यू  द्यायचा हे आम्ही ठरवू असा टोला संजय राऊतांनी लगावला.

फडणवीस सरकारचा 'मृत्यू' अटळ

शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाहीतर सरकारचा मृत्यू अटळ आहे. शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहे. पण निर्णय काही होत नाहीये. फक्त मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरू आहे. तुम्हाला पीएचडी कधी मिळणार याची आम्ही वाट पाहतोय. जशी परीक्षेची वेळ असते तरी या सरकारच्या परीक्षेची वेळ येणार आहे असंही राऊत म्हणाले.

'मध्यावधी निवडणुकीसाठी तयार'

मध्यावधी निवडणुका लागू झाल्या तर भाजपच्या आधी आम्ही तयार आहोत. आम्ही तयार झालो म्हणून भाजप निवडणुकीसाठी तयार झाले आहे. भाजपने जर निवडणुका लादल्या तर सेना पूर्ण ताकदीने तयार आहे असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे'

बहर येतो. बहर उतरतो. कधी तरी आमचाही बहर येईल.  जर मध्यावधी निवडणुका झाल्यातर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छाही राऊतांनी बोलून दाखवली.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांमध्ये मुख्यमंत्र्यांनी फूट पाडली

राजू शेट्टींचा भाजप सरकारला पाठिंबा आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस हे सदाभाऊ खोतांशी बोलता. सदाभाऊ हे मंत्री आहे. संघटनेत फूट पाडायची, विचारात भेद निर्माण करायचे, हे गलिच्छ राजकारण फडणवीस करत आहे असा थेट आरोप राऊतांनी केली. तसंच आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा वेगळं असल्याची संधी होती पण भाजपने ती गमावलीये.

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतांनाच पाठिंबा

शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहे त्यांना शेतीतलं कळतंय. खुद्द पंतप्रधानांनीच त्यांचा सल्ला घेत असल्याचं स्पष्ट केलंय.  शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत नाही. जर त्यांनी अर्ज भरला तर त्यांना कोण पाठिंबा देत हे आम्हाला पाहावं लागेल. पण आमचा पाठिंबा हा मोहन भागवतांना असणार आहे. राष्ट्रपतीभवनात मराठी माणूस बसला पाहिजे अशी ठाम भूमिका राऊतांनी मांडली.

First published: June 9, 2017, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading