• होम
  • व्हिडिओ
  • सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का ? - भाग 2
  • सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का ? - भाग 2

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 7, 2009 11:58 AM IST | Updated On: Jan 7, 2009 11:58 AM IST

    मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत निराश झालेल्या राणे यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता मात्र हीच कारवाई रद्द होण्याची शक्यता आहे. 6 जानेवारीला राणे आपला निर्णय जाहीर करणार होते. मात्र आता काँग्रेस-राणेंमध्ये दिलजमाई झालीय. त्यामुळे राणेंनी आता काँग्रेस न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरच होताआजचा सवाल - सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का ? या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राणेसमर्थक आमदार कन्हैय्यालाल गिडवाणी, शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई हे नामवंत पाहुणे उपस्थित होते.6 जानेवारीला राणे निर्णय जाहीर करणार होते. राणे नव्या पक्षाची घोषणा करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र राणेंनी आपला निर्णय का फिरवला असावा, यावर बोलताना कन्हैय्यालाल गिडवाणी म्हणाले "राणे 6 तारखेला निर्णय जाहीर करणार होते आणि त्यांनी तो जाहीर केला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल तर्क-वितर्क केले जात होते. पण त्यावर राणेंचा निर्णय कधीच अवलंबून नव्हता. राणेंनी जो निर्णय घेतला आहे, तो विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यातून काही तरी चांगलं निष्पन्न होईल हा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलाय. मी स्वत: काँग्रेस अध्यक्षांना भेटलो. मला जे काही वाटत होतं, ते मी त्यांच्याजवळ बोललो. पण मी राणेची कोणतीही शिफारस केली नाही. जो काही निर्णय आहे तो राणेंनी घेतला आहे, मी नाही. " एकूणच फारसं बोलण्यास किंवा खुलासे करण्यास गिडवाणी फारसे उत्सुक नव्हते.राणेंविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले "हा राणे आणि काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर शिवसेनेनं भाष्य करण्याचं शिवसेनेला गरज नाही. नारायण राणे यांना माननीय शिवसेनाप्रमुखांनी पक्षातून काढलं होतं. खरं तर राणे 25 वर्षं शिवसेनेत होते. नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व काही त्यांना दिलं. पण कृतघ्नपणा करत त्यांनी शिवसेना सोडताना खूप खालच्या दर्जाचे आरोप केले. आता काँग्रेसनंही राणेंना काढलंय. म्हणजे एखाद्या द्वाड मुलाला वारंवार वर्गातून बाहेर काढावं तसं हे झालं. आम्ही राणेंना विसरून गेलोय. त्यांच्याशिवाय आम्ही पुढचा प्रवास केलाय. त्यामुळे राणे कुठे राहिले आणि कुठे गेले यावर शिवसेनेचं राजकारण ठरत नाही. त्यामुळे आता राणेंच्या निर्णायाचा शिवसेनेला फरक पडत नाही." राणेंच्या भूमिकेचं विश्लेषण करताना संजय राऊत यांनी ही सरळ सरळ राणेंची माघार असल्याचं स्पष्ट केलं. "राणेंनी काँग्रेस सोडताना अनेक वरिष्ठ नेत्यांवर त्यांनी आरोप केले. एकतर मी संपेन किंवा काँग्रेस अशा वल्गना त्यांनी केली होती. सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांनी लायकी काढली आणि आता त्याच मुख्यमंत्र्यांना ते भेटले. लाथ घालायची आणि मग परत बोलवायचं हे काँग्रेसचं धोरणच आहे. आज बघितलं तर जी काही स्थित्यंतरं झाली ती राणेंच्या भूमिकेत झाली, काँग्रेस आहे तिथेच आहे." असं ते म्हणालेहेमंत देसाई यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. "राणेंनी बाहेर पडल्यावर विलासराव देशमुखांचे कथित गैरव्यवहार बाहेर काढले होते. अत्यंत गर्हणीय भाषेत अशोक चव्हाण यांची संभावना केली. काँग्रेस हायकमांडवर आरोप केले होते. अगदी दहशतवादाचे आरोप केले. सोनिया गांधींवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. यानंतर अशी चर्चा होती की ते स्वत:चा पक्ष काढतील. े पण नंतर त्यांच्या लक्षात आलं असावं की आपली राजकीय किंमत घटली आहे. 20-25 आमदारांचा पाठिंबा त्यांना अपेक्षित होता. पण तो मिळत नाही तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय फिरवला. ज्या अशोक चव्हाणांवर त्यांनी टीका केली, त्यांच्याच अंडर काम करण्याची तयारी दाखवली, याला मागार नाही तर काय म्हणायचं ?" राणे काँग्रेस हाय कमांडवर प्रहार करत असताना गिडवाणी सतत त्यांच्याबरोबर होते. पण या चर्चेत राणेंनी काँग्रेस हायकमांडवर केलेल्या टीकेबद्दल त्यांनी हात झटकले "मी राणेंच्या शेजारी बसलो तरी, त्यांचं सगळं म्हणणं मला मान्य होतंच असं नाही. पण राणे जे काही बोलले, ते माझ्याशी चर्चा करून बोलले नव्हते." असं त्यांनी स्पष्ट केलं.काँग्रेसमध्येच रहाण्याच्या राणेंच्या भूमिकेचं विश्लेषण करताना हेमंत देसाई म्हणाले "विजय वडेट्टीवारीचं बंड हा राणेंना मोठा धक्का होता. येत्या निवडणुकीच्या तोंडावर ही साहसी खेळी करावी का ? याविषयी ते साशंक होते.पण मुळात काँग्रेसवर आरोप करतानाही राणेंनी परतीचे दोर कापले नव्हते. त्यांनी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, ए.के. अ‍ॅन्टोनी आणि प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत आदर दाखवला होता. कदाचित त्यामुळेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राणेंनी आरोप मागे घेतल्यास काँग्रेसमध्ये स्वागत करण्याचे संकेत दिले. पण मुळात राणेंनी ब्लॅक मेलिंगची खेळी करून आपली किंमत वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राणे राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत जाणार, बसपमध्ये जाणार, अशा अफवा पसरवल्या. पण मुळात एखाद्या शेअरची किंमत वाढवम्याचा प्रयत्न केला तरी जर त्या शेअरमध्येच दम नसेल, तर त्याची किंमत खाली येते. तसं राणेंचं होत गेलं. आधी आपणच राज्याचे मुख्यमंत्री, जनता नी आमदारांचा आपल्यालाच पाठिंबा आहे, महाराष्ट्राचं कल्याण आपणच करू शकतो हा जो त्यांचा ताठा होता, तो उतरला. आता संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ते तिळगूळ घ्या गोड बोला म्हणत काँग्रेसमध्ये परत परत जातील. एखादं मंत्रीपदही स्वीकारतील. पण एवढे गंभीर आरोप करूनही काँग्रेस त्यांना स्वीकारतेय, हे खेदजनक आहे. "राणेंनी स्वीकारण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर राऊत यांनीही टीकेची झोड उठवली. "काँग्रेसला मोठी परंपरा आहे. सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी असे मोठे नेते या पक्षात होऊन गेले. त्या काँग्रेसमधील सदस्यांवर राणेंनी देशद्रोहाचे आरोप केले. असे आरोप आजपर्यंत विरोधी पक्षांनीही केले नव्हते. तरीही काँग्रेस त्यांना स्वीकारत असेल, तर ही खूप मोठी अधोगती आहे. पक्षाचं धोरण, शिस्त काही आहे की नाही ? काँग्रेसची धर्मशाळा झालीय" असे आरोप संजय राऊत यांनी केले.सत्ता गेल्यावर मित्र सुद्धा पाठ फिरवतात, म्हणून सत्ता जाण्याच्या भीतीने राणेंनी माघार घेतली का ? या प्रश्नाचं उत्तर देताना गिडवाणी म्हणाले "इथे माघारीचा संबंधच येत नाही. त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी निर्णय फक्त पुढे ढकलला आहे." आपण राणेंसाठी दूताचं काम केल्याचा गिडवाणी यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. "मी सोनिया गांधींना राणेंचा दूत म्हणून भेटलो नाही. सोनिया गांधींना मी दर तीन चार महिन्यांनी भेटत असतो. तशीच ही भेट होती. मी राणेंची कोणतीही रदलाबदली केली नाही. पण मी एवढेच म्हणेन की कोणत्याही पक्षासाठी राणे हे अ‍ॅसेट आहेत. लायबलिटी नक्कीच नाही."नारायण राणे किंवा काँग्रेसच्या पलिकडे जाऊन अशा राजकारणामुळे एकूण राजकीय संस्कृतीला तडा जातोय का ? या प्रश्नाचं उत्तर देताना हेमंत देसाई म्हणाले "नक्कीच तडा जातोय, पण हे करणारे राणे काही पहिले राजकारणी नाहीत. याआधीही अशा तत्वशून्य आघाड्या झाल्यात. राजकीय तडजोडी झाल्यात. त्यामुळे असं राजकारण हे भारतीय राजकारणाचा भाग झालाय. राणे हे काही तत्वनिष्ठ नगैरे नेते आहेत, असा कोणाचाच समज नाही. येत्या निवडणुकांच्या दृष्टीने राणेंनी आपली ताकद जोखलीय. काँग्रेसनही विचार केला असावा की सध्या महाराष्ट्रातल्या नंबर वन पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ चालू आहे. आणि राणे हे काही अगदी क्षुद्र नेते नाहीत. त्यांची महाराष्ट्रात नक्कीच मोठी ताकद आहे. त्यादृष्टीने राणे आत असतील, तर काँग्रेससाठी ते नक्कीच फायद्याचं आहे."याच प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले "अशा प्रकारच्या प्रवृत्ती शिवसेनेत आल्या होत्या. राणे हे त्याचच एक उदाहरण. म्हणूनच त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी झाली. त्यानंतर अशी माणसं पक्षात असू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण एकूणच देशाच्या राजकारणाला सत्तेची वखवख लागली आहे. प्रत्यक्ष जेव्हा फायद्याच्या गोष्टी येतात, तेव्हा त्यापासून लांब पळताना फारसं कोणी दिसत नाही." याच वेळी "राणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा हा निर्णय सगळ्यांनाच मान्य आहे आणि हा निर्णय बदलला जाणार नाही" असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का ? याप्रश्नाचं उत्तर 47 टक्के प्रेक्षकांनी होय असं दिलं तर 53 टक्के प्रेक्षकांनी नाही असा कौल दिला.या चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले "राणे यांनी एक राजकीय वादळ निर्माण केलंय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काय होणार ? याचा विचार ज्याचा त्याने करावा."

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी