• होम
  • व्हिडिओ
  • दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का ? (भाग - 2)
  • दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का ? (भाग - 2)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 20, 2008 05:58 AM IST | Updated On: Dec 20, 2008 05:58 AM IST

    26 / 11 च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण जग हादरलं. शिवराज पाटील, विलासराव देशमुख, आर.आर. पाटील या नेत्यांनी दबावानंतर 26 / 11 च्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामे दिले. तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षावर स्वत:च्या बेजाबाबदारपणा दाखवत आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी देश कोणत्या संकटातून जात आहे, त्याचाही राणेंना विसर पडला. मुख्यमंत्रीपदाचं वादळ शमतंन् शमतं तोच महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि त्यांच्या दोन सहका-यांच्या वीरमरणापुढे प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री अ. र. अंतुले यांनी केला. ' करकरे मृत्यू 'च्या संशय कल्लोळात स्वत:च अडकलेल्या अंतुलेंना शेवटी राजीनामा दिला. अंतुलेंच्या राजीनाम्याची मागणी करणारा भाजपही अडचणीत येणार आहे. देशावर दहशतवादाचं संकट ओढावूनही मंत्र्यात मंत्र्यात सत्तेसाठी जी हाणामारी चालली आहे त्यावरून नेत्यांना परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचं लक्षात येत आहे. ' आजचा सवाल ' या सगळ्या संमिश्र पण गंभीर परिस्थितीवर आधारित होता. दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का? या 'आजच्या सवाल 'वर चर्चाकरण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित, काँग्रेसचे प्रवक्ते उल्हासदादा पवार, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस या नामवंत पाहुण्यांचा समावेश होता.एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूभोवती संशयाचं जाळं विणणा-या अ. र. अंतुले यांच्या भूमिकेवर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "अ. र. अंतुले हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते केंद्रीय नेते आहेत, तसंच ते काँग्रेस पक्षाचे राज्याचे माजी सरचिटणीस आहेत. त्यांच्यासाठी केंद्रात अल्पसंख्यांक हे खातं तयार करण्यात आलं आहे. या खात्यानं गेल्या दोन-तीन वर्षांत काय केलं हा संशोधनाचा मुद्दा आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सलोख घडवून आणणं, सच्चर कमिटीनं जो अहवाल सादर केला आहे, त्या अहवालाचा अभ्यास करून काम करणं हे अंतुलेंचं काम आहे. जे काम करायचंते राहिलं बाजुलाच... जे काम करायचं नाही ते त्यांनी केलेलं आहे. अंतुलेंचं अज्ञान यातून समोर आलं आहे, " अशी तिखट शब्दात हेमंत देसाईंनी अंतुलेंवर टीका केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का? या प्रश्नावर आपलं मत मांडताना निर्माता-दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ' ए.आर.अंतुलेंचं नाव घ्यायलाही लाज वाटते आहे ' , अशा प्रखर शब्दात अंतुलेंचा निषेध करत त्यांच्या भारतीय संसदेच्या सदस्यत्वावरही संशय व्यक्त केला आहे. "अंतुलेंच्या आरोपाने पाकिस्तानच्या हातात दहशतवादाचं समर्थन करण्याचं आयतंच कोलीत मिळालं आहे. अंतुले पाकिस्तानसाठी काम करत आहेत. ते मंत्री असताना महाराष्ट्रात दाऊदचं प्रस्थ वाढलं होतं. अंतुलेंना परिस्थितीचं भानच नाही. अल्पसंख्यांक खात्याच्या मंत्र्याला असं वागणं शोभत नसल्याचं " अशोक पंडित चर्चेत म्हणाले. " महात्मा गांधीजींच्या विचारांवर, तत्त्वांवर ज्या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आहे, त्या पक्षाचा मंत्री असं बोलतो आहे, हे चूक आहे. दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे, " असं चर्चेत काँग्रेसचे प्रवक्ते उल्हासदादा पवार परखड भूमिका घेत म्हणाले. " अंतुले हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत म्हणून मी त्यांचा विरोध करत नाहीये तर त्यांचं वक्तव्य शहिदांच्या बलिदानाला बट्टा लावून गेलं आहे. अ.र.अंतुले जर भाजपचे नेते असते आणि माझ्या पक्षात राहून जर त्यांनी असं विधान केलं असतं, तरीही मी त्यांचा निषेध केला असता, असं प्रमाणिक मत तरुण आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का? या ' आजच्या सवाल 'वर 83 टक्के लोकांनी ' हो ' असा कौल दिला. या चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे न्यूज एडिटर मंदार फणसे म्हणाले, " आता गरज आहे ती संयमाची आणि विचार करून भूमिका घेण्याची. असं झालं तर देशावर आलेल्या संकटाचा सगळे एक येऊन समना करू ."

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी