ही गोष्ट आहे मुंबईतल्या साहित्य सहवासातली. एक मोठी कॉलनी. तिथं मोठमोठी नामांकित माणसं रहात असतात. त्या कॉलनीच्या शेजारी एक छोटी झोपडी असते. हलाखीची परिस्थिती, गाठीला अठराविश्व दारिद्र्य, शिक्षण नसल्यामुळे त्या झोपडीतल्या पारधे पती-पत्नींना मोठ्या माणसांच्या कॉलनीतल्या घरांची कामं करावी लागतात. आई-बाबा कॉलनीतल्या मोठ्या माणसांचं कर्तृत्व पाहून इतके भारावून जातात की, त्यांच्यात आपल्या मुलांना शिक्षण देण्याची ऊर्मी निर्माण होते. बिकट परिस्थितीवर मात करून त्या झोपडीतल्या आई-बाबांची मुलं शिकतात. परिसाच्या स्पर्शानं लोखंडही सोनं बनतं, असं काहीसं या मुलांच्या बाबतीत घडतं. ही मुलं मोठी होतात, शिकतात. ज्यांना एकेकाळी दोन वेळचंअन्न मिळत नसतं, अंगभर कपडे घालयाला मिळत नसतात त्यांचं कार्यकर्तृत्व आजच्या घडीला ब-याच जणांसाठी स्फुर्तीदायी ठरणार आहे. ही गोष्ट वाचून तुम्हालाही ती असामी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असणार. आणि ते स्वाभाविकच आहे. जेव्हा मी स्वत: ही गोष्ट माझ्या मित्राकडून ऐकली तेव्हा माझीही अवस्था तुमच्यासारखी झाली होती. तर ही व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ पारधे!नुकतंच सिद्धार्थ लक्ष्मण पारधे यांचं ' कॉलनी ' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांच्या हस्ते झालं. ' कॉलनी ' हे पुस्तक वांदे्र पूर्व इथल्या साहित्य सहवासातल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबाच्या जडणघडणीवर आधारित आहे. सिद्धार्थ पारधे हे मूळचे पारधी समाजातले. मुळात पारधी ही समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात. गावाबाहेर झाडाखाली मुक्काम ठोकायचा, भीक मागायची वा चो-या मा-या करायच्या. त्या गावातला शेर सरला की, पुढल्या गावाकडे मुक्काम हलवायचा - हे सतत चालू असतं. पोटभर अन्न मिळण्याची मारामार - त्यांना शिक्षण घेण्याची चैन कशी परवडणार? जवळपासच्या गावातून कुठं चोरी झाली, दरोडा पडला, म्हणजे पोलीस आजही पारध्यांच्या वस्तीवर छापा घालतात आणि प्रसंगी निरपराध पारध्यांना पकडून नेतात. अशा या जमातीत जन्मलेले सिद्धार्थ परार्थ शिकले - सवरले, चांगल्या ठिकाणी नोकरीत स्थिरावले आणि सुस्थितीत आले. आज सिद्धार्थ पारधेंचा त्याच्या कुटुंबाला नाही तर साहित्य सहवासातल्या प्रत्येक कुटुंबाला अभिमान वाटतो. त्यांनी जे काही अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि अपार दारिद्र्यावर मात करून आपल्याला कसे घडवलं हे त्यांनी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये प्रांजळपणे, मनमोकळेपणानं सांगितलंय.अनेकांना स्फुती देणारा सिद्धार्थ पारधेंचा जीवनप्रवास शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.