S M L
  • गर्जा महाराष्ट्र : यमगरवाडी

    Published On: Aug 6, 2011 03:05 PM IST | Updated On: Dec 15, 2014 03:41 PM IST

    "शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.." कविश्रेष्ठ नारायण सुर्वेंच्या या ओळी ज्या समाजघटकाला अचूक लागू पडतात, ते हे भटके विमुक्त. पारधी, बहुरुपी, मसणजोगी, वडारी, कोल्हाटी, गोपाळ अशा जवळपास 52 जातीं-जमाती. ज्यांची पाळमुळं रुजली आहेत संस्कृतीच्या गडद-गूढ अंधारात. यमगरवाडी म्हणजे एक प्रवास तो अंधार भेदण्याचा.. शेकडो आयुष्यांच्या भणंग नशिबावर, प्रकाशाचा एक छोटासा कवडसा म्हणजे यमगरवाडी ! ज्येष्ठ समाज कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांनी या 'यमगरवाडी पॅटर्न'चा पाया रचला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान आणि विकास परिषद या दोन संस्थांच्या आधारे १९९३ साली हे कार्य सुरू झालं. रानावनात हुंदडणारी ही रानपाखरं. यमगरवाडीच्या त्या झोपडीवजा शाळेत पालापालांवरून एकत्र आणली गेली तो दिवस होता २२ ऑगस्ट १९९३. अवघे पंचवीस विद्यार्थी तेव्हा होते. काही अस्वच्छतेमुळे अनारोग्याने ग्रासलेले. शाळेत कोण टिकायला मागत नव्हतं. मुलं पळून जायची.. कारण असं शिक्षण त्यांच्या परंपरेत कोणी घेतलं नव्हतं. मुलींना तर त्यांचे पालक पाठवतच नव्हते.आज यमगरवाडीत जवळपास चारशे विद्यार्थी आहेत. त्यात जवळपास एकशे छत्तीस मुली. हे चारशे विद्यार्थी म्हणजे चारशे कहाण्या आहेत. अंगावर शहारे उमटवणा-या. कोणाचे आईवडील आहेत, कोणाच्या घरच्यांचा पत्ता नाही. कोणाचा बाप आठ-आठ नऊ-नऊ वर्ष जेलमध्ये. तर कोणी स्वतःच्या डोळ्यादेखत बापाने आईचा खून करताना पाहिलेलं. शाळेतल्या शिक्षकांच्या मोबाईलवर कधीतरी येणारा आपल्या पालकाचा फोन तरीही त्यांच्या चेह-यावर हास्य उमटवतो. अशा या यमगरवाडीची ही एक झलक... जिने या भटक्या विमुक्तांना मायेने पोटाशी धरलंय. नुसतं मायेने पोटाशी धरलंय असं नव्हे तर शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि सन्मान मिळवून दिला. त्यांच्यातले नैसर्गिक गुण हेरून त्यांना उत्तेजन दिलंय. विज्ञानाची ही प्रयोगशाळा आणि त्यातले हे स्पेसिमेन्स. यात विशेष काय असं तुम्ही म्हणाल. शहरी शाळांसारखे हे साप वगैरे विकत आणलेले नाहीत. ते या मुलांनीच पकडलेत. घुबडासारखी मान फिरवताना यमगरवाडी म्हणजे अडतीस एकरवरची फक्त एक शाळा नाही. माणूसपणाच्या वाटेवरचं कृतीतून सिद्ध झालेलं ते एक भाष्य आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close