S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र
  • गर्जा महाराष्ट्र : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र

    Published On: Jul 10, 2011 04:59 PM IST | Updated On: Dec 15, 2014 03:42 PM IST

    एखादं राज्य किंवा देश जर आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अग्रेसर होणं जरुरीचं असेल तर अगदी सुरुवातीपासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जोपासण्याची गरज असते. गरज असते ती विज्ञानात आवडीने काम करणारी माणसं तयार करण्याची. तिनं केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अगदी गावखेड्यापर्यंत विज्ञानाचाच विचार नेण्याचं काम केलंय. एचबीसीएसई... अर्थात होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन म्हणजेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र. ज्याची स्थापना झाली १९७४ मध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, म्हणजेच टीआयएफआर या संस्थेचं हे एक राष्ट्रीय केंद्र आहे. ज्याचा मुख्य उद्देश आहे देशात वैज्ञानिक साक्षरतेच्या विकासासाठी प्रयत्न करणे, आणि विद्यालय शिक्षणापासून ते पदवीपर्यंत विज्ञान आणि गणित शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या ग्रँटरोड परिसरातील टोपीवाला हायस्कूलच्या दोन वर्गातून या संस्थेचं काम चालत होतं. इक्विटी, एक्सलन्स आणि रिसर्च म्हणजेच समता, उत्कृष्टता आणि संशोधन या त्रिसुत्रीवर आधारीत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची दिशा ठरवली गेली. त्यानुसार गावागावात जाऊन, शाळा-शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक प्रबोधनाचं काम या संस्थेनं केलं. गावागावातील विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्यास सोपं जावं म्हणून उपलब्ध वस्तूंमधूनच या संस्थेनं लो कॉस्ट कीट्स तयार केले, आणि ते ग्रामीण भागात वाटले, हसत-खेळत प्रयोगाच्या माध्यमातून या मुलांचं शंका-निरसन करून त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण कशी होईल यावर भर दिला. विज्ञान केवळ पाठ्यपुस्तकात बंद न राहता ते त्यातून बाहेर काढून मुलांच्या हातात कसं पोहोचेल, प्रत्यक्ष कृतीवर आधारीत उपक्रमांचा समावेश त्यात कसा करता येईल याकडे सातत्याने लक्ष पुरवल्याने लवकरच होमी भाभा विज्ञान केंद्राचं नाव देशात सर्वत्र झालं आणि विज्ञानातील शंका-समाधानांचं निराकरण करून घेण्यासाठी होमी भाभा विज्ञान केंद्र देशभरातील मुलांचं एक हक्काचं स्थान बनलं. मुलांच्या वेगवेगळ्या शंकांमधूनच शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकातलं विज्ञान आणि प्रत्यक्ष त्यांच्या जीवनातलं अनुभवातलं विज्ञान यातली तफावत कशी मिटवता येईल याचे प्रयत्न होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सुरू झाले. राज्य आणि देशभरात विज्ञान साक्षरतेची मोहीम राबवताना संस्थेच्या लक्षात आलं की मुलांच्या त्यांच्या सोप्या भाषेतून जर शिकवलं तर त्यांना अधिक आकलन होतं. यासाठी विज्ञान शिक्षणातील संशोधनाला या केंद्रातून चालना मिळाली. आणि याचा पहिला प्रयोग झाला तो भाषेत. संस्थेच्या अनेक अधिका-यांना पाठ्यपुस्तक मंडळावर तसंच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमासाठी निमंत्रण दिलं गेलं. आज शैक्षणिक अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाची भाषा सोपी करण्याकडे जो कल आहे ते या संस्थेच्या गेली दोन दशकं चालवलेल्या प्रयत्नांचं फलित आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close