• शालोम इस्त्राएल - भाग 3

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 28, 2008 02:35 PM IST | Updated On: May 13, 2013 04:14 PM IST

    अलका धुपकरस्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या साठ वर्षांत इस्त्राएलने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो कृषी क्षेत्रात त्यंानी केलेल्या प्रगतीचा. फळशेतीपासून ते डेअरीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात केलेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा. या हायटेक संशोधनामुळेच देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचं योगदान 1.5 टक्के इतकं आहे. पण शेतीत काम करणार्‍यांची संख्या मात्र आहे फक्त 64,400. 1999 ते 20007 या काळात इस्त्राएलमध्ये डेअरी रिफॉर्मचा कार्यक्रमही राबवण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे या देशाचं दूध उत्पादन 150 कोटी लीटरवर गेलंय. इथे प्रत्येक डेअरीत जवळपास हजार गायी असतात आणि प्रत्येक गाय दरदवशी 40 लीटर पेक्षा जास्त दूध देते. "दूध काढण्यापासून ते गायींना किती किलो खाणं द्यायचं इथपर्यंत प्रत्येक गोष्ट इथं मशीननं केली जाते" असं अफिमील्क डेअरीचा मार्केटिंग प्रमुख डाफन रेगेव याने सांगितलं. अहमदाबादपासून जवळ असलेल्या आणंदमध्ये अफिमील्क ही डेअरी सुरू होणार आहे. आत्ता याच्या डिझायनिंगचं काम सुरु आहे. डेअरी असो किंवा शेती, इस्त्राएलसारख्या निम्म्या वाळवंटी असलेल्या देशात पाण्याचा मर्यादित साठा हा कधीच प्रगतीमधला अडथळा ठरला नाही. गरज ही शोधाची जननी असते, असं म्हणतात. त्यातूनच ठिबक सिंचनासारखं तंत्रज्ञान ही इस्त्राईलची जगाला मिळालेली देणगी आहे. जळगावमधली जैन इरिगेशन कंपनी आणि इस्त्राईलमधली नानदान कंपनी सातत्यानं सिंचनामध्ये अशा नवीन टेक्नॉलॉजी आणत आहेत. नानदान-जैन या कंपनीने संपूर्ण ऑटोमेटिक सिंचन व्यवस्थेवर फुलशेतीच्या निर्यातीमध्येही आघाडी मिळवली आहे. याशिवाय इस्त्राएलमध्ये वापरलेलं 70 टक्के पाणी हे रिसायकलिंग करुन शेतीत वापरलं जातं. इस्त्राएलचं महाराष्ट्राशी असलेलं नातं हे फक्त स्थलांतंपुरतंच मर्यादित नाही, तर अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ही देवाणघेवाण सुरु आहे. "आम्ही याची काळजी घेतो की, रुट झोनमध्ये जास्तीत जास्त पाणी मिळेल आणि त्यामुळे खतांचाही योग्य वापर होईल. हो पण त्या शेतकर्‍यानं हा विचार करावा की खतावर अधिकचा खर्च करत राहून कमी उत्पादन मिळवायचं की चांगल्या सिंचन व्यवस्थेवर एकदाच गुंतवणूक करायची ते" असं नानदान जैन या कंपनीचे सीईओ अ‍ॅवनर हर्मोनी यांनी सांगितलं. नानदान जैन ही इरिगेशनमधली जगातली दोन नंबरची कंपनी आहे. आणि युरोप आणि आशियामध्ये या कंपनीचं मार्केट वाढतंय.इस्त्राएलमधल्या कंपन्याना भेट देत आम्ही 19 देशांचे 34 पत्रकार पोचलो ते नर्सरीमध्ये. इस्त्राईलमधली 'हिस्टेल' ही प्रसिद्ध नर्सरी. या नर्सरीची इस्त्राएलमध्ये 21 हेक्टरवर ग्रीन हाउसेस आहेत. याशिवाय पाच देशांतही त्यांच्या नर्सरीज आहेत. या नर्सरीमध्ये बीयाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या लागवडीची प्रक्रिया सुरु केली जाते. मातीमध्ये फलन झालेली बियाणी इथं आणून लावली जातात. आणि काही तासातच त्याला मूळ यायला सुरवात होते. त्यानंतर आठ दिवसांनी ही रोप शेतात नेउन लावता येतात. फू लांप्रमाणेच टोमॅटोसारख्या फळबाज्यांची रोपही इस्त्राईलमध्ये अशाच नर्सरीमध्ये तयार केली जातात. "आम्ही एकूण नर्सरी उत्पादनात 10 टक्के ऑरगॅनिक रोपं घेतो. ऑरगॅनिक शेतीसाठीची मागणी सध्या वाढतेय. त्यानुसार आम्ही आमच्या उत्पादनातही वाढ करणार आहोत" असं या नर्सरीच्या संचालकांनी सांगितलं. रोपांसाठी जी बियाणी लागतात त्यासाठीही स्वतंत्र कंपन्या काम करतात. ठराविक शेतकर्‍यांकडून त्यासाठी शेतमाल विकत घेतला जातो. शेतकर्‍याकडून आलेल्या शेतमाल आला की त्याचावर प्युरिटी, जर्मिनेशन अशा पाच टेस्ट केल्या जातात. त्यानंतर त्याच्यावर पुढच्या प्रक्रिया सुरु होतात. बीयाणं टिकवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया केल्या तरीही त्याच्या गुणधर्मात कुठलाही बदल होत नाही, असा कंपन्याचा दावा आहे. पाण्याची बचत, हायब्रीड बियाणी आणि त्याचं नर्सरीत झालेलं संगोपन या सगळ्यामुळे इस्त्राएलमध्ये पीकाची उत्पादकता ही अधिक असते. पण उत्पादन आल्यानंतर शेवटी तेवढीचं महत्वाची असते ती त्याच्यावरची प्रक्रिया. इस्त्राएलमधली 70 टक्के फळं ही निर्यात केली जातात. त्यामुळे शेतातून माल इथं आल्यानंतर सुरु होते ती प्रक्रिया. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक नगाची घेतली जाणारी योग्य ती निगा. डेअरी, शेती, जमीन, पाणी, मधूमक्षीकापालन या सगळ्या क्षेत्रातल्या नव्या संशोधनाविषयी एकत्रित माहिती देणारं अ‍ॅग्रोटेक प्रदर्शन तेलअवीवमध्ये यंदा आयोजित करण्यात आलंय. दर तीन वर्षांनी हे प्रदर्शन इस्त्राईल सरकारकडून ठेवलं जातं. प्रोसेसिंग तंत्रज्ञान, इकोलॉजिक आणि इकोफ्रेंडली तंत्रज्ञान यासगळ्याची माहिती देणारं हे प्रदर्शन 5 ते 7 मे दरम्यान चालणार आहे. या प्रदर्शनाची अधिक माहिती www.agritech.org.il या वेबसाईटवरही देण्यात आलेय. तेव्हा या प्रदर्शनाच्या निमित्ताने तुम्हालाही नक्कीच इस्त्राएलला भेट देता येईल. संघर्षांचा इतिहास आणि झपाट्यानं प्रगतीकडे वाटचाल करणार्‍या इस्त्राईलचा र्तमानही तितकाचा धगधगणारा आहे, हेच आम्हाला या भेटीत उमगलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading