एखाद्या अननसाची किंमत लाखो रुपयांत असेल असं सांगितलं तर कुणालाही आश्चर्य वाटेल. असंच अननस चर्चेत आलं आहे. हेलिगन अननस ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. विक्री किंमत नव्हे तर त्याच्या लागवडीचा, उत्पादनाचा खर्चच एक लाख रुपये आहे. हा अननस इंग्लंडच्या लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगनमध्ये उत्पादित केला जातो. बागेच्या नावावरून या अननसाचं नाव हेलिगन अननस असं ठेवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा अननस सर्वात आधी 1819 साली ब्रिटनमध्ये आणण्यात आला. त्यानंतर लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगनला गिफ्ट करण्यात आला. गार्डनच्या अधिकाऱ्यांनी 1999 मध्ये या अननसाची शेती करायला सुरुवात केली. इंग्लंडमधील वातावरण या अननसाच्या शेतीसाठी पोषक नाही. त्यामुळे काही ट्रिक्स वापरल्या जातात. हे अननस एका कुंडीत उगवलं जातं. एका कुंडीत फक्त एकच अननस उत्पादित केलं जातं. हा अननस तयार व्हायला दोन ते तीन वर्षे लागतात. या अननसाची लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो, असा दावा केला जातो. याची अद्याप विक्री झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते, विक्री केल्यास यापासून 10 लाख रुपये मिळू शकतील. हे अननस श्रीमंत, उच्चभ्रू लोकांना गिफ्ट केलं जातं. (सर्व फोटो - द लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगन ट्विटर)