

कर्नाटकमध्ये चंदनाच्या लाकडापासून ड्रग्ज रॅकेटचा पोलीस पर्दाफाश करत असताना उत्तर कर्नाटकातील मंदिरांमध्ये तर चक्क गांजा (Marijuana) पवित्र म्हणून वापरला जात आहे. येथील काही मंदिरांमध्ये चक्क प्रसाद म्हणून गांजा दिला जातो.


सरना, अवधूत, शप्त, अरुणा परंपरेत मारिजुआना किंवा गांजाचे विविध प्रकारे सेवन केले जाते. त्यास आध्यात्मिक अनुभूतीचे साधन मानले जाते. यादगीर जिल्ह्यातील तिनाथिनी येथील मौनेश्वर मंदिरात जानेवारीत होणाऱ्या जत्रेत भाविकांना प्रसाद म्हणून गांजाचे पॅकेट दिले जाते.


हा गांजा मौनेश्वर किंवा मनप्पा देवाची प्रार्थना केल्यानंतर खाल्ला जातो. मुख्य म्हणजे मंदिर समितीच्या वतीनेच हा गांजा दिला जातो. समितीचे सदस्य गंगाधर नायक म्हणाले की, गांजाचे सेवन येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते.


संत आणि भक्तांचा असा विश्वास आहे की हे पवित्र गवत अध्यात्मिक प्रबोधनाच्या मार्गावर लोकांना घेऊन जाते. मात्र मंदिराच्या बाहेर गांजा विक्रीस बंदी आहे.