अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2020 च्या निकालांना डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध केला होता. तेव्हापासूनच असं वाटत होतं की, ते पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत, आणि व्हाईट हाऊस सोडणार नाहीत. पण अलीकडेच त्यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया स्वीकारली आहे. यामुळे 20 जानेवारी 2021 ला जो बायडन यांचा अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा मार्ग मोकळा होणार आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प काय करतील याबाबत आता अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.
अमेरिकेत अध्यक्षपद सोडल्यानंतर बऱ्याच माजी राष्ट्रपतींनी वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर लोकांना धक्का बसला. यावेळी लोकांना डोनाल्ड ट्रम्प काय करणार यात जास्त रस आहे, कारण ते पारंपरिक राजकारणी नाहीत. अशा परिस्थितीत बऱ्याच लोकांना असे वाटत आहे की त्यांनी माजी राष्ट्रपतींसारखं पद सोडल्यानंतर काम केलं पाहिजे, पण हे शक्य होईल असे वाटत नाही.
डोनाल्ड ट्रम्प आपली राजकीय कारकीर्द थांबण्याची शक्यता नाही. त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलॅंड यांच्या मार्गाचा अवलंब केला असावा. क्लीव्हलँड 1885 मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर1893 मध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. अमेरिकेच्या घटनेनुसार एखादी व्यक्ती केवळ दोनदा अध्यक्षपदाचा कारभार सांभाळू शकते. सर्व विरोधांनंतरही ट्रम्प पुढच्या निवडणुकांसाठी ते पुन्हा उभे राहतील अशी शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प आपला व्यवसाय सांभाळण्याचीदेखील शक्यता आहे. अध्यक्षपद सांभाळण्यापूर्वी ते रियल इस्टेट मोगल आणि रियालिटी टेलिव्हिजन स्टार, स्वतःच्याच ब्रँडचे ब्रँड अँबेसेडर होते. पण अध्यक्षपद हाती आल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय थोडा बाजूला ठेवला. आता ते आपल्या व्यवसायाला पुन्हा सुरू करतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर सध्या चार अब्ज डॉलरचे कर्ज आहे, जे ट्रम्प यांच्या मते त्यांच्या निव्वळ संपत्तीचा एक छोटासा भाग आहे. त्यांच्या नावावर बरीच हॉटेल्स आणि गोल्फ कोर्स आहेत.
आता अध्यक्षपद सोडल्यानंतर, नक्की डोनाल्ड ट्रम्प काय करणार याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात ते आपला व्यवसाय पुढे नेतील का टेलिव्हिजन आणि मीडियाशी संपर्क साधून अजून काही दुसऱ्या गोष्टी करतील, याबाबत देखील अंदाज वर्तवले जात आहेत. ते एक तर स्वतःचा चॅनेल उघडू शकतात किंवा ते नेटवर्कशी कनेक्ट करू शकतात असे अनेक अंदाज आता वर्तवले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना आता राष्ट्रपती पेन्शन आणि इतर अनेक सुविधा मिळतील. 2017 मध्ये पेन्शन दरवर्षाला 2 लाख डॉलरपेक्षा जास्त होते. तसंच त्यांना आयुष्यभरासाठी सिक्रेट सर्व्हिस सुद्धा मिळतील. आरोग्य आणि इतर सुविधादेखील त्यांच्यासाठी उपलब्ध असतील. 74 वर्षांचे असलेले ट्रम्प निवृत्तीही स्वीकारू शकतात, पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ट्रम्प यांच्या मनस्थितीवरून तसं वाटत नाही. गेल्या महिन्यात स्वतः ट्रम्प यांनी असे म्हटलं होतं, की त्यांनी निवडणूक हरल्यास कदाचित देश सोडावा लागेल.