जगभरात ठिकठिकाणी दिसणाऱ्या Monolith चं नेमकं रहस्य काय?
जगभरात अनेक ठिकाणी चमकदार मोनोलिथ दिसतात. हे मोनोलिथ कसे येतात, कुठे जातात याबाबत कोणालाच काही माहीत नाही. काही जणं जमिनीतून वर आलेला एक पांढऱ्या रंगाचा दगड असं मोनोलिथचं वर्णन करतात. काहींची मतं वेगळी आहेत पण जगभरात हे मोनोलिथ दिसतात. काय आहे रहस्य या मोनोलिथचं ....


मोनोलिथ (Monolith) हा काही नवा शब्द नाही. मात्र गेल्या एक महिन्यापासून हा शब्द सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मोनोलिथ म्हटलं की जमिनीवर एखादा माणूस उभा राहावा तसा एक उभा दगड (Stone) असे चित्र पुढे येते. मात्र गेल्या काही काळापासून चमकदार मोनोलिथ (Shiny Monolith) आढळत आहेत. रोमानिया, ब्रिटन, बेल्जियम आदी अनेक देशांमध्ये अशा रहस्यमय चमकदार आकृत्यांनी लोकांना बुचकळ्यात टाकलं आहे.


सगळ्यात प्रथम अशा आकृत्या अमेरिकेतील उटाह आणि कॅलिफोर्निया भागात आढळल्या. त्यानंतर रोमानिया आणि इजल ऑफ व्हाईटमध्ये (Isle of White) अशा आकृत्या पाहण्यात आल्या. गेल्या महिन्याच्या मध्यापासून ते आतापर्यंत अनेक ठिकाणी हे चमकदार खांब आढळले आहेत. मात्र त्याची अचूक व्याख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. सोशल मीडियावर याबाबत अनेक मीम्स आणि दंतकथा येत आहेत.


मोनोलिथ म्हणजे मोठ्या आकाराचे उंच असे दगड किंवा पाषाण असतात. पुरातन काळात असे दगड काही खास ठिकाणी ठेवण्यात येत असावेत. इतिहास संशोधकांना अशा प्रकारचे पाषाण युगातले अनेक दगड मिळाले आहेत. पण अलीकडे जे मोनोलिथ आढळले आहेत, ते धातूचे आणि चमकदार आहेत. सगळ्यात पहिला मोनोलिथ गेल्या महिन्यात 18 तारखेला अमेरिकेतील उटाह वाळवंटात एका हेलिकॉप्टरमधून दिसला होता.


वैज्ञानिक आणि संशोधक या मोनोलिथचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतानाच 9 दिवसांनंतर हा मोनोलिथ गायबच झाला. जसा रहस्यमयरीत्या तो सापडला होता, तसाच तो गायब झाला. त्याचवेळी रोमानियातील (Romania) डोंगरांमध्ये एक मोनोलिथ आढळला. त्याचदरम्यान, पेट्रोदावा देकीयान किल्ल्याजवळ बघण्यात आलेला मोनोलिथ नाहीसा झाला. यानंतर असाच एक नवीन मोनोलिथ दक्षिण कॅलिफोर्नियातील डोंगराळ भागात आढळला आणि तोही असाच अचानक गायब झाला.


डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर इजल ऑफ व्हाईटच्या ( Isle of White) पश्चिमेला कॉम्प्टन बीचवर (Compton Beach) एक चमकदार मोनोलिथ आढळला. याशिवाय नेदरलँड्समधील (Netherlands) स्थानिक वृत्तपत्रात ओउदहोर्न शहराजवळ केकनबर्ग रिझर्व्हमध्ये एक मोनोलिथ आढळल्याचे म्हटलं होतं. मोनोलिथ हे डोळ्यांना दिसत असले तरीही ते काय असतात आणि ते कसे गायब होतात हे मात्र कोडंच आहे.