The Economist या प्रसिद्ध मासिकाने जगामध्ये राहण्याच्या खर्चावर एक सर्वेक्षण केलं होतं त्यात जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी घोषित केली होती. त्यात यंदा तेल अवीवने पॅरिसला मागे टाकत पहिले स्थान पटकावलं आहे. 2021 च्या या सर्वेक्षणात राहणीमानातील खर्चाच्या आधारावर 173 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता.
सप्लाय चेनमधील आलेल्या समस्यांमुळे राहणीमानाच्या खर्चात या वर्षी मोठी वाढ झाल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे. कोरोना महामारी थांबवण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांचा उत्पादन आणि व्यापार या दोन्हींवर परिणाम झाला. या यादीत दुसरे स्थान पॅरिसचे आहे जे मागील वर्षी अव्वल होते. फ्रान्सची राजधानी फार पूर्वीपासून जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. त्यानंतरही येथे पर्यटकांची आवक कमी झालेली नाही.
पॅरिसप्रमाणेच सिंगापूर हे देखील जगभरातील पर्यटकांसाठी आवडत्या शहरांपैकी एक आहे जे खूप महाग आहे. त्यामुळे पॅरिसनंतर सर्वात महागड्या शहरांमध्ये सिंगापूरने स्थान मिळवलं आहे. सिंगापूर हे आग्नेय आशियाचे आर्थिक केंद्र मानलं जातं. येथील कायदे अतिशय कडक आहेत. त्यामुळे येथे दरोड्यासारख्या घटना नगण्य आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जगातील अव्वल शहरांमध्येही त्याचा समावेश होतो.
जगातील अनेक लोक हे स्वित्झर्लंडला पर्यटनाचं नंदनवन मानतात याचं कारण या ठिकाणचं सौंदर्य आहे. स्वित्झर्लंडमध्ये राहणं आजही खूप महाग आहे. त्यामुळे झुरिच शहरही पर्यटकांना राहण्यासाठी महाग पडतं. गेल्या काही वर्षांत येथे राहण्याचं भाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण या शहरात फारच कमी अपार्टमेंट्स आहेत. हे स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठे शहर तसेच एक प्रमुख व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्रही आहे.
हाँगकाँग हे जगातील अशा काही शहरांपैकी एक आहे जिथं पूर्व आणि पाश्चात्य संस्कृतीचे मिश्रण पाहायला मिळतं. ब्रिटनची वसाहत झाल्यानंतर आता तो चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश मानला जातो. येथे राहणे खूप महाग होत आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. दाट लोकवस्तीच्या या शहरात उंच इमारतींनंतरही भाडे खूप जास्त आहे. महागड्या शहरांमध्ये हाँगकाँग पाचवे सर्वात महागडे शहर आहे.