जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावर रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक होऊन राख आणि दगड बाहेर पडत आहेत. सध्यातरी आजूबाजूच्या शहरांमध्ये कोणतंही नुकसान किंवा दुखापत झाल्याचं वृत्त नसलं तरी स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेनं सांगितलं आहे की, साकुराजिमा ज्वालामुखीचा स्फोट रात्री 8:05 च्या सुमारास झाला. या उद्रेकातून निघणारे दगड अडीच किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पडले आहेत.
जपानच्या सरकारी NHK टीव्हीवर प्रसारित झालेल्या व्हिज्युअल्समध्ये ज्वालामुखीतून निघणाऱ्या ज्वाला आणि राखेचे प्लम्स उठताना दिसत होते. उपमुख्य कॅबिनेट सचिव योशिहिको इसोझाकी म्हणाले की, “आम्ही लोकांच्या जीवाला प्राधान्य देत आहोत आणि परिस्थितीचं आकलन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” त्यांनी परिसरातील लोकांना अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील.