

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. पुण्यातील विमानतळावरून उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाले आहे. शनिवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ते भाजपात दाखल होणार आहेत.


महाजनादेश यात्रेवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदयनराजे भोसले यांना घेण्यासाठी पुणे विमातळावर पोहोचले होते.


आपल्या बेधक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी अखेर भाजपची वाट धरली आहे. भाजपच्या मेगा भरतीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबर धक्का बसला आहे.


नाही-नाही म्हणत असताना अखेर उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी काही त्यांनी अटी घातल्याचं बोललं जातं आहे.


खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. तसंच पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी या अटी भाजपनं मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं.