ऑस्ट्रेलियन समुद्रात आढळणारी कोकोस कीलिंग बेटाची 27 जोडलेली बेटं त्यांच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यटक दरवर्षी सुट्टी घालवण्यासाठी किंवा फिरण्यासाठी येतात. खरंतर हा असा परिसर आहे जो समुद्राच्या दगडांनी आणि स्वच्छ वाळूने भरलेला असायचा. असं वाटत होतं की जणू इथे कोणी आलंच नाही. म्हणूनच याला कधीकधी स्वर्ग देखील म्हटलं जातं.
परंतु 2017 मध्ये दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे, टास्मानिया युनिव्हर्सिटी आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की बेट सुमारे 414 दशलक्ष प्लास्टिकच्या तुकड्यांनी वेढलेले आहे. त्यांचे एकूण वजन 238 टन सांगितले जात आहे, जे व्हेलच्या वजनाच्या जवळपास आहे. हा अभ्यास काही काळापूर्वी सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.
अहवालात असं म्हटलं आहे की, 1990 पासून येथे प्लास्टिकचा, विशेषत: सिंगल यूज प्लास्टिकचा वापर वाढला आहे. टास्मानिया विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर मरीन अँड आर्क्टिक स्टडीज विभागातील संशोधन शास्त्रज्ञ जेनिफर लीव्हर्स यांनी हा दावा केला आहे. या अभ्यासाच्या प्रमुख लेखक आहेत. या प्लॅस्टिकला कुठेतरी जावंच लागतं आणि या कचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये बहुतांश प्लास्टिक वाहून जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय नद्या आणि समुद्रातही ते जमा होत आहे, असं त्या लिहितात.
अभ्यासानुसार, मासे, पक्षी आणि समुद्री प्राणी प्लास्टिक सोडाच्या बाटल्यांमध्ये अडकत आहेत. प्लास्टिकच्या जाळ्यात अडकण्याबरोबरच ते प्लास्टिकचे छोटे कणही गिळत आहेत, त्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. समुद्रातील प्लास्टिकची समस्या अतिशय धोकादायक बनली आहे. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे नाहीत तेवढे केवळ प्लास्टिकचे तुकडे महासागराच्या याच भागात सापडले आहेत, असं या अभ्यासात म्हटलंय. प्लॅस्टित सागरी जीवसृष्टीचा मोठ्या प्रमाणावर नाश करत आहे.
या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, हे सागरी प्राणी चुकून प्लास्टिकचे हे तुकडे खातात असे नाही, तर हे प्राणी प्लास्टिकचे तुकडे शोधून खात असल्याचं आढळून आलं आहे. याचं कारण असे की, या प्लॅस्टिकच्या तुकड्यांचा वास बराच वेळ समुद्रात पडून राहिल्याने मासे किंवा सागरी प्राण्याला हा तुकडा अन्न असल्याचा भ्रम होतो आणि ते अन्न म्हणून गिळतात.
या प्लॅस्टिकच्या कचऱ्यात टूथब्रश, फूड पॅकेट्स, कोल्ड ड्रिंक स्ट्रॉ आणि प्लास्टिक पिशव्या या सर्वात प्रमुख गोष्टी आढळतात. म्हणजेच एकूण प्लॅस्टिक कचऱ्यापैकी 25% हा एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे. परंतु त्यातील सुमारे 60% प्लास्टिकचे छोटे तुकडे आहेत. हे मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या विघटनातून तयार होतात. हे 0.08 इंचापर्यंतचे छोटे तुकडे आहेत, म्हणजे तांदळाच्या दाण्याच्या अर्धे.