प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड काहीसा वाढू लागला आहे. जर या दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इलेक्ट्रिक कार खरेदी करणं हा एक चांगला पर्याय आहे. भारतात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हुंदाई, एमजी मोटर्स आणि मर्सिडीज बेंझ यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल आणले आहेत. सध्या आपल्या देशात 6 इलेक्ट्रिक कार आहेत.
हुंदाई कोना Hyundai Kona: देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या हुंदाईच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये सिंगल स्पीड ट्रान्समिशनसह 39.2 किलोवॅट क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे, जे 135 एचपीची शक्ती आणि 395 एनएम टॉर्क जनरेट करते. कोना 10 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0-100 किमी ताशी इतका वेग घेते आणि तिचा टॉप स्पीड 145 किमी ताशी आहे. एका चार्जमध्ये 452 किमीपर्यंत जाण्याची क्षमता या कारमध्ये आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने कोनाची बॅटरी 60 मिनिटांपेक्षा कमी वेळात 80 टक्के चार्ज होते. त्याच वेळी, स्टँडर्ड चार्जरसह फुल चार्ज होण्यासाठी किमान 6 तास लागतात. या गाडीची एक्सशोरूम किंमत दिल्लीमध्ये 23.7 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा टिगोर ईव्ही Tata Tigor EV: टाटा टिगोर ईव्ही ही ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट सेडान असून एक्स-शोरूम दिल्लीतील किंमत 9.58 लाख रुपये आहे. कारमध्ये 21.5 किलोवॅट क्षमतेचं बॅटरी पॅक आणि 72 व्ही 3-फेज एसी इंडक्शन मोटर आहे, ही मोटर 30 केडब्ल्यूची जास्तीत जास्त शक्ती आणि 105 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. टिगोर ईव्ही पूर्ण चार्ज केल्यावर 213 किमी अंतर धावू शकते. टिगोर ईव्ही स्टँडर्ड एसी नॉर्मल चार्जरसह 11.5 तासात फुल चार्ज केली जाऊ शकते. त्याच वेळी 15 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरसह, 80 टक्के कार चार्ज करण्यासाठी कारला फक्त 2 तास लागतात. टिगोर ईव्हीचा टॉप स्पीड 80 किमी / ताशी आहे. नवीन टाटा टिगोर ईव्ही व्यावसायिक आणि खाजगी दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
मर्सिडीज-बेंझ ईक्यूसीएल Mercedes-Benz EQCL: या यादीतील सर्वांत महाग इलेक्ट्रिक कार. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात ही गाडी लाँच करण्यात आली असून किंमत 99.30 लाख रुपयांपासून सुरू होते. ही इन्ट्रोडक्टरी किंमत या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पहिल्या 50 युनिट्ससाठी आहे. ईसीक्यूची विक्री मर्सिडीज बेंझ इंडियाच्या ई-कॉमर्स वेबसाइट आणि दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या सहा शहरात केली जाईल.
टाटा नेक्सन ईव्ही Tata Nexon EV: या इलेक्ट्रिक कारची एक्सशोरूम किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते. टाटा नेक्सन ईव्ही नवीन झिपट्रॉन टेक्नॉलॉजी वापरते. कारमध्ये 30.2 केडब्ल्यूएचची लिथियम आयन IP67 रेट केलेली बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक कारची इलेक्ट्रिक मोटर 129 एचपी पॉवर आणि 254 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. नेक्सन ईव्ही एका चार्जमध्ये 312 किमी पर्यंत प्रवास करू शकते. फास्ट चार्जिंगसुद्धा उपलब्ध आहे. नेक्सन ईव्ही 4.6 सेकंदात 0-60 किमी ताशी आणि 10 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0-100 किमी ताशी वेग पकडण्यास सक्षम आहे. नेक्सन ईव्हीची बॅटरी 50 केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जरने एका तासाच्या आत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. स्टँडर्ड 3.3 केडब्ल्यू होम चार्जरच्या मदतीने, फुल चार्ज होण्यासाठी 7-8 तास लागतात.
महिंद्रा ई व्हेरिटो Mahindra E Verito: महिंद्रा ई व्हेरिटोची (एबीएस व्हर्जन) दिल्लीत एक्सशोरूम किंमत सबसिडीनंतर 9,12,515 रुपयांपासून सुरू होते. ई व्हेरिटोमध्ये 3 फेज एसी इंडक्शन मोटर आहे. यात 31 किलोवॅटची शक्ती आणि 91 एनएम पीक टॉर्क जनरेट होतो. यात 21.2 केडब्ल्यूएचची लिथियम आयन बॅटरी आहे. ई व्हेरिटो फुल चार्ज केल्यावर 181 किमी प्रवास करू शकते. नॉर्मल चार्जिंगमध्ये 11 तास 30 मिनिटांत कार फुल चार्ज होते, तर फास्ट चार्जिंगमध्ये 80 टक्के चार्ज होण्यासाठी दीड तास लागतो. ई व्हेरिटो 11.2 सेकंदात 0-60 किमी / ताशी वेग प्राप्त करू शकतो. कारचा टॉप स्पीड 86 किमी/ताशी आहे.
एमजी झेडएस ईव्ही MG ZS EV: एमजी मोटर्सची ऑल इलेक्ट्रिक लाँग रेंज एसयूव्ही झेडएस ईव्हीची एक्सशोरूम किंमत 20.88 लाख रुपयांपासून सुरू होते. कारची इलेक्ट्रिक मोटर 141 एचपी पॉवर आणि 353 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. बॅटरी पॅक 44.5 किलोवॅट क्षमतेचा आहे, ज्याला 50 किलोवॅट फास्ट चार्जरसह 40 मिनिटांत 80 टक्के चार्ज करता येतं. 7 किलोवॅटच्या चार्जरसह 7 तासांच्या आत कारला फुल चार्ज केलं जाऊ शकतं. एमजी झेडएस ईव्ही फक्त 8.5 सेकंदांत 0-100 किमी प्रतितासचा वेग घेते आणि एकाच चार्जमध्ये 340 किमीपर्यंत प्रवास करू शकते.