टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आता सुपरस्टार झाला आहे. विराट जेव्हा बॅटिंगला येतो तेव्हा क्रिकेट रसिक हातातलं कामही सोडून देतात. विराटसोबतच आता ऋषभ पंतनेही (Rishabh Pant) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पण विराट आणि पंत यांचा जिगरी दोस्त असलेल्या क्रिकेटपटूने वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. दिल्लीचा रणजी क्रिकेटर मनन शर्मा (Manan Sharma) याने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली.
माजी क्रिकेटपटू अशोक शर्मांचा मुलगा असलेल्या मननने 35 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 27.45 च्या सरासरीने 1,208 रन केले, यामध्ये एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 560 रन केले. तसंच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 113 विकेट आणि लिस्ट एमध्ये 78 विकेट घेतल्या. मनने 26 टी-20 मॅचमध्ये 32 विकेट घेतल्या आणि त्याचा इकोनॉमी रेट 6.07 एवढा होता.
मनन शर्मा उपयुक्त क्रिकेटपटू होता. आयपीएलमध्ये कोलकात्याने 2016 साली त्याला 10 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. मननने 2017 साली अखेरची प्रथम श्रेणी आणि 2019 साली शेवटची लिस्ट ए मॅच खेळली. यानंतर त्याला दिल्लीच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही. याच कारणामुळे त्याने वयाच्या 30 व्या वर्षी संन्यास घेतला.