

भारतीय कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये नुकताच 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भारताच्या या स्टार खेळाडूवर सध्या जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पण किंग कोहलीसाठी वैयक्तिक रेकॉर्ड्सला फारसं महत्त्व नाही. बीसीसीआयला दिलेल्या एका मुलाखतीत विराटने त्याच्या रेकॉर्ड्समागील गुपितं आणि टीमवर्कचं महत्त्व सांगितलं आहे.


‘जर टीम इंडियाला गरज असेल तर धाव घेण्यासाठी मी एका ओव्हरमध्ये सहावेळ डाईव्ह मारायला तयार आहे,’ असं विराट कोहलीने म्हटलं आहे.


‘टीमसाठी मेहनत घेऊन मी फार मोठं काम करतोय असं नाही. संघासाठी लढणं ही तर माझी जबाबदारी आहे,’ असं विराटनं म्हटलं आहे.


दरम्यान, वेस्ट इंडिजविरूद्धची दुसरी वनडे मॅच टाय झाली असली तरी ही मॅच विराट कोहलीने खऱ्या अर्थाने गाजवली. या सामन्यात विराटने अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले. सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा विक्रमही विराटने मोडला.