वयाच्या 32 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने आपल्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत बोलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अवघ्या 7 धावांत सहा विकेट्स घेतल्या. बोलंडच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 68 धावांवर आटोपला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाने हा सामना आणि अॅशेस मालिकाही जिंकली.
स्कॉट बोलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात अवघ्या 21 चेंडूत सहा विकेट्स घेतल्या. त्याने अवघ्या 19 चेंडूत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याआधी ऑस्ट्रेलियन गोलंदाज एर्नी तोशकने 1947 मध्ये भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत केवळ 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. तोशकच्या विक्रमाची बरोबरी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्रेंटब्रिज कसोटीत केली होती. ब्रॉडनेही अवघ्या 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. बोलंडने सर्वात कमी चेंडूत 6 बळी घेत इतिहास रचला.
स्कॉट बोलंड हा ऑस्ट्रेलियाचा 463 वा कसोटी क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा बोलंड हा चौथा आदिवासी क्रिकेटपटू आहे. हा गोलंदाज वेस्टर्न व्हिक्टोरिया राज्यातील गुलिदजान या आदिवासी जमातीचा आहे. स्कॉट बोलंडने 2016 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो ऑस्ट्रेलियासाठी 14 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 16 आणि टी-20 मध्ये तीन विकेट्स आहेत.
स्कॉट बोलँडच्या आधी एक पुरुष आणि दोन महिला आदिवासी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळलेले आहेत. फेथ थॉमस ही महिला आदिवासी क्रिकेटपटू आहे जिनं पहिल्यांदा हे स्थान मिळवले. वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी हा कसोटी खेळणारा पहिला आदिवासी पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील महत्त्वाची सदस्य असलेली अष्टपैलू ऍशले गार्डनर ही दुसरी महिला आदिवासी क्रिकेटपटू आहे.