

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी स्वपना बर्मनने इतिहास रचला. स्वपना बर्मनने हेप्टाथलन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्वपनाच्या या सुवर्णभरारीमुळे भारताच्या खात्यात अकरावे सुवर्णपदक जमा झाले.


स्वपनाने हेप्टाथलनचे एकूण ७ इव्हेंट पार केले. यामध्ये शेवटच्या इव्हेंटमध्ये चीनची क्विनलिंग वांगला मागे टाकत तिने ६०२६ गुणांसह प्रथम स्थान पटकावले.


२२ वर्षीय स्वपनाचा जन्म पश्चिम बंगालमध्ये गरीब घरात झाला. तिचे वडील पंचानन बर्मन हे रिक्षा चालवून त्यांचे घर सांभाळायचे.


२०१३मध्ये जेव्हा त्यांना अटॅक आला तेव्हापासून ते अंथरुणाला खिळले. घरातील एकुलता एक कमवता हातच अंथरुणाला खिळल्यामुळे बर्मन कुटुंबाला आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागलं.


घरात दोन वेळच्या जेवणाची वानवा असताना खेळासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पैसे कुठून येणार. घरची अशी बिकट परस्थिती असतानादेखील सुकांत सिन्हा या तिच्या प्रशिक्षकांनी तिची भरपूर साथ दिली.


खेळातून मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेमधून त्यांचे घर चालत होते. अशा अवस्थेत राहुल द्रविडच्या गो स्पोर्ट फाऊंडेशन या अॅथलीट मॅण्टॉरशिप कार्यक्रमाद्वारे तिला मदत करण्यात आली.