टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यावर खराब फॉर्ममुळे सातत्याने टीका होत आहे. या दोघांचं करियर आता संपलं आहे, असं मानलं जात आहे. पुढच्या सीरिजसाठी या दोघांनाही टीममध्ये संधी मिळणं कठीण आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मात्र पुजारामध्ये आणखी क्रिकेट बाकी आहे, पण रहाणेचं करियर संपल्याचं मत मांडलं आहे.
अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये तिन्ही मॅच खेळल्या. यात त्याला फक्त एकच अर्धशतक करता आलं. रहाणेने सीरिजच्या 6 इनिंगमध्ये फक्त 136 रन केले. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सीरिजच्या दुसऱ्या टेस्टमध्ये रहाणेने 58 रनची खेळी केली. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रहाणे 48 रन करून आऊट झाला. याशिवाय त्याला खास कामगिरी करता आली नाही.
टीम इंडिया आता श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये रहाणे आणि पुजाराला टीममध्ये स्थान मिळणं कठीण आहे. ही जोडी मागच्या 2 वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. एवढच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजआधी रहाणेचं टेस्ट टीमचं उपकर्णधारपदही गेलं. श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांना संधी दिली जाऊ शकते.
माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्या मते केपटाऊन टेस्ट रहाणेची शेवटची टेस्ट होती. मांजरेकरांनी रहाणेची तुलना विराट कोहलीशी केली. विराटही शतक करण्यासाठी संघर्ष करत असला तरी तो बॅटिंग चांगली करतोय. रहाणे त्याची अखेरची टेस्ट मॅच खेळला हे मी म्हणालो तर आश्चर्य वाटायला नको. हे रन करण्याबाबत नाही, पण खेळाडू मैदानात कोणत्या रणनितीसह उतरतो आणि कसा दिसतो यावर आहे. 2017 पासूनच रहाणेने तो थोडा अनिश्चित आहे, हे दाखवून दिलं होतं, असं मांजरेकर म्हणाले.
संजय मांजरेकर यांनी पुजाराला मात्र पाठिंबा दिला आहे. 'पुजारा 100 टेस्ट मॅच खेळण्याच्या जवळ आला आहे. त्याला बाहेर करण्यासाठी निवड समितीला विचार करावा लागेल. मला वाटतं रहाणेपेक्षा पुजाराकडे जास्त वेळ आहे. हे त्याच्या बॅटिंगच्या पद्धतीकडे बघून कळतं, दुसरं कोणतंही कारण नाही. मला वाटतं पुजारामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे. पण रहाणे... मी निवड समितीमध्ये असतो तर तो दोन वर्षांआधीच माझ्या योजनेतून बाहेर असता,' असं वक्तव्य मांजरेकरांनी केलं.