

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरत आहे. मंगळवारी सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाल्याचं समोर आलं.


रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या चमुत चिंतेचं वातावरण होतं. दरम्यान, रोहितची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही आगामी काळातील सामने व विश्वचषक लक्षात घेता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.


मात्र, या प्रकारामुळे रोहित शर्माच्या नावावर एक वेगळी घटना नोंदवली गेली आहे. आतापर्यंत 133 सामने खेळलेल्या रोहितनं केवळ दोन वेळा आयपीएलमध्ये विश्रांती घेतली आहे.


2011 साली मुंबई संघाचा भाग झाल्यापासून, आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माला विश्रांती देण्याचा हा दुसरा सामना ठरला आहे. तर, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना, रोहितला विश्रांती देण्यात आली होती.