रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई इंडियन्स सहाव्या विजेतेपदापासून फक्त दोन पावलं दूर आहे. यंदाचं वर्षही मुंबईसाठी गेल्यावर्षीसारखंच आहे. मुंबईने पहिल्या ८ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका होता. पण शेवटच्या ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवून मुंबईने प्लेऑफचं तिकिट मिळवलं. त्यानंतर क्वालिफायर २ मध्ये ते गुजरात टायटन्सविरुद्ध लढणार आहेत.
२०२२ चे आय़पीएल मुंबईचे सर्वात खराब आय़पीएल होते. संघ दहाव्या स्थानी होता आणि फक्त चारच सामने जिंकू शकला होता. पहिला विजयसुद्धा नवव्या सामन्यानंतर मिळाला होता. यंदाच्या हंगामात मुंबईची सुरुवात चांगली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदाही गतवर्षीप्रमाणेच मुंबई बाहेर पडणार अशी चर्चा होती. त्यातच जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या दुखापतीने मुंबईचे टेन्शन वाडलं.
आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स बुमराह शिवाय उतरली. गेल्या वर्षी दुखापत झाल्यानंतरही जोफ्रा आर्चरला मोठी किंमत मोजून मुंबईने संघात घेतलं. तर झाय रिचर्डसनसुद्धा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत तरुण गोलंदाजांना संधी दिली गेली आणि त्यांनीही संधीचा फायदा घेतला. आकाश मधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर या गोलंदाजांना संधी मिळाली त्याचं सोनं केलं. यात जेसन बेहरनडॉर्फचाही समावेश आहे.
आकाश मधवालने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने लखनऊ आणि सनरायजर्स हैदराबादविरुद्धचे सामने जिंकले. लखनऊविरुद्ध त्याने पाच धावात पाच बळी घेत दाणादाण उडवून दिली. आकाशने मुंबईला जसप्रीत बुमराहची उणीव भासू दिली नाही. डेथ ओव्हरमध्येही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. सुरुवातीच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने मुंबईसाठी हे काम केलं.
मुंबई इंडियन्सचे दिग्गज फलंदाजसुद्धा धावांसाठी धडपडताना दिसत आहेत. रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांना फारशा धावा करता आलेल्या नाहीत. पण तरुण फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. तिलक वर्मा, नेहल वढेरा हे यामध्ये आघाडीवर आहेत. तिलक वर्मा दुखापतीमुळे काही सामन्यात खेळू शकला नाही. मात्र त्याने 10 सामन्यात 43 चया सरासरीने 300 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर नेहल वढेराने 13 सामन्यात 2 अर्धशतकासह 237 धावा केल्या.
सूर्यकुमारची सुरुवात चांगली नव्हती पण आयपीएलच्या आधी कसोटी संघातून त्याला डच्चू देण्यात आला. ऑस्ट्रेलियात तो सलग तीन एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातही त्याला धावा करता आल्या नाहीत. मात्र त्यानंतर अखेरच्या सामन्यांमध्ये तुफान फटकेबाजी केली. आतापर्यंत त्याने 544 धावा केल्या आहेत.