

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)चा विकेट कीपर आणि त्यांचा सगळ्यात मोठा मॅच विनर ऋषभ पंत (Rishabh Pant)ला संघर्ष करावा लागला आहे.


पंतने 12 मॅचमध्ये 28.50 च्या सरासरीने 285 रन केले आहेत. या मोसमता पंतला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. त्याचा सर्वाधिक स्कोअर 38 रन आहे. फटकेबाजीमुळे ओळख मिळालेल्या पंतचा यंदाचा स्ट्राईक रेटही फक्त 109.61 आहे.


ऋषभ पंतच्या या बॅटिंगमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. अशाच चाहत्यांनी ऋषभ पंतच्या बहिणीकडे मदत मागितली आहे. ऋषभची बहिण साक्षी पंतने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेयर केला. यानंतर चाहत्यांनी ऋषभला समजव, अशी कमेंट फोटोवर केली. भावाला सांगं पॉण्टिंगच्या नादाला लागू नकोस, तू ऋषभशी बोल, असं आवाहन या चाहत्याने केलं. पॉण्टिंगच्या सांगण्यामुळे ऋषभ त्याचा खेळ बदलत असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.


आयपीएलमधल्या खराब कामगिरीचा फटका ऋषभ पंतला बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 टीममध्ये पंतची निवड झाली नाही. तर टेस्टमध्ये मात्र त्याला स्थान देण्यात आलं आहे. टेस्टमध्ये पंत असला तरी ऋद्धीमान सहाची निवड झाल्यामुळे विराट पंतला संधी देईल का नाही? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.