पाकिस्तानात सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी 1 मार्च 2021 ला होणारा क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड हा सामना मंगळवारी 2 मार्च 2021 ला पाकिस्तानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळावला जाणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सोमवारी ट्विट करून दिली.
‘आमच्या टीममधील एक खेळाडू फवाद अहमद याला कोविड-19 ची बाधा झाली असून त्याला तातडीने 2 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. टीममधील इतर खेळाडू आणि सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असून खेळाडूंना सामना खेळण्याची परवानगी वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळाली आहे. फवाद लवकर बरा होवो अशी सदिच्छा.’असं ट्विट इस्लामाबाद युनायटेडने केलं.
पीसीबीने म्हटलंय की पीएसएलमधील इतर टीममधील खेळाडूंची कोविड तपासणी केली जात आहे. फवादला लागण झाल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या खुशालीसाठी सोशल मीडियावर संदेश पाठवले आहेत, त्यांना फवादने धन्यवाद दिले आणि चाहत्यांना या भयानक विषाणूपासून दूर राहण्याचं आवाहनही केलं आहे. ‘तुम्ही पाठवलेल्या सर्व प्रकारच्या मेसेजेसबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थना करा त्याची जास्त गरज आहे. कृपया सर्वांनी सुरक्षित रहा,’ असं ट्विट फवादने केलं आहे.
इस्लामाबादने या स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत पण शनिवारी झालेल्या सामन्यात मात्र त्यांचा पराभव झाला. रियाझच्या नेतृत्वाखालील पेशावर झालमीने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इस्लामाबादचा सहा विकेट्सनी पराभव केला. भारतातील प्रचंड लोकप्रिय आयपीएल स्पर्धेपासून प्रेरणा घेऊन विविध देशांत स्थानिक क्रिकेट लीग सुरू झाल्या आहेत.