

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत दुखापतग्रस्त झालेला भारताचा युवा खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉबद्दल वेगवेगळ्या चर्चा माध्यमातून केल्या जात होत्या. यात त्याच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. मात्र आता त्या आरोपांना पृथ्वी शॉने फेटाळून लावले आहे.


दुखापत झाल्यानंतर पृथ्वी शॉ त्यातून तंदुरुस्त होण्याकडे लक्ष देत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच त्याला इतर युवा खेळाडूंप्रमाणे काही वाईट सवयी असल्याचेही म्हटले जात होते.


पृथ्वी शॉच्या अशा वागण्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला समजावून सांगितले होते. याबद्दल स्वत: पृथ्वीने माहिती दिली होती.


आता मात्र पृथ्वीने या सर्व गोष्टींचे खंडण केले आहे. चुकीच्या वर्तनामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून त्याला परत पाठवल्याच्या वृत्ताला त्याने फेटाळून लावले आहे.


सराव करताना झालेल्या जखमी झालेल्या पृथ्वीला तिसऱ्या कसोटीत खेळता येईल अशी चर्चा होती. मात्र, त्याला मायदेशात परत पाठवण्यात आले होते.


पृथ्वीचे लक्ष खेळावर नसून दुसऱीकडेच असल्याची चर्चा झाली होती. मात्र, या सर्व अफवा असून मी याकडे लक्ष देत नाही असे पृथ्वी शॉने सांगितले.


मला तेव्हा कोणीही मी मेहनत करत नसल्याचे सांगितले नाही. माझी खेळण्याची इच्छा होती पण दुखापत झाली होती असे पृथ्वी म्हणाला.