

वर्ल्ड कप 2019मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचा मॅच विनर गोलंदाज मोहम्मद आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी याबाबत आमीरनं अधिकृत घोषणा केली आहे. असे असले तरी,आमीर स्थानिक क्रिकेट खेळत राहणार आहे.


आमीरनं 36 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30.47च्या सरासरीनं 2.85च्या इकॉनॉमीनं 119 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षीय आमीरनं पाकिस्तानसाठी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये कसोटी सामनेच होत नसल्यामुळं आमीरनं आपली निवृत्ती जाहीर केली आहे.


दरम्यान निवृत्ती घेतल्यानंतर आमीर पाकिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. आमिरला आता पाकिस्तानकडून खेळायचे नाही आहे. त्यामुळं त्यानं ब्रिटनकडे नागरिकत्वाची मागणी केली आहे.


द ट्रिब्युननं दिलेल्या माहितीनुसार, आमीरनं 2016मध्ये ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या नरगिस मलिकशी लग्न केले होते. त्यामुळं आमीरनं ब्रिटेनकडे नागरिकत्वाची मागणी केली आहे. सध्या आमीर लंडनमध्ये घर शोधत आहे.