इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्सवरच्या या टेस्टमधून डेवॉन कॉनवेने (Devon Conway) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. कॉनवे हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे, त्याने 2009 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. काही वर्ष दक्षिण आफ्रिकेकडून खेळल्यानंतर तो 2017 साली न्यूझीलंडमध्ये आला.
29 वर्षांच्या कॉनवेने करियर बनवण्यासाठी सप्टेंबर 2017 साली जोहान्सबर्ग सोडलं. कॉनवेने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्या स्तराचं क्रिकेट खेळलं, पण तिकडे त्याला फार संधी मिळाली नाही. यानंतर त्याने न्यूझीलंडला जायचं ठरवलं. कॉनवे वेलिंग्टनला गेला आणि त्याने धमाका केला. 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये कॉनवेने 1,598 रन केले. त्याची सरासरी 72 पेक्षा जास्त होती.
कॉनवेने 108 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 47.21 च्या सरासरीने 7,130 रन केले. यात 18 शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडकडून खेळलेल्या 14 टी-20 मॅचमध्ये त्याने 59.12 च्या सरासरीने 473 रन केले. तर 3 वनडेमध्ये त्याने 75 च्या सरासरीने 225 रन ठोकले. कॉनवे अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे, पण त्याची शैली एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या स्थानिक क्रिकेटमध्ये कमी संधी मिळत असल्यामुळे कॉनवे निराश होता. फ्रॅन्चायजी क्रिकेटमध्ये कॉनवेची कामगिरी चांगली झाली नाही, पण त्याला संधीही थोडक्याच मिळाल्या. वनडे, टी-20 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंग केली, त्यामुळे त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिलं नाही. आपल्या मित्रांच्या सल्ल्याने कॉनवे न्यूझीलंडला आला. न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्यासाठी कॉनवेनं सगळं काही विकून टाकलं. मी माझी संपत्ती, कार आणि सगळं काही विकून टाकलं जे आम्हाला इकडे आणता आलं नाही. तो अध्याय बंद करून सगळं काही नव्याने सुरू करायचं होतं, असं कॉनवे एका मुलाखतीमध्ये म्हणाला.