

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सीरिज गुरुवारपासून (17 डिसेंबर) सुरू होत असून, पहिला सामना ऍडलेडच्या मैदानावर होत आहे. ही टेस्ट डे-नाईट असून यासाठी गुलाबी बॉलचा वापर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या कर्णधारपदी टिम पेन असून, भारताचे नेतृत्त्व विराट कोहली करत आहे.


2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करत, पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आजही हा पराभव विसरलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा बॉलर मिशेल स्टार्कच्याही हा पराभव अजून लक्षात आहे. या चार सामन्यांच्या कसोटी सीरिजमध्ये गेल्या वेळच्या चुका सुधारण्याची चांगली संधी असल्याचं स्टार्कनं म्हटलं आहे.


स्टार्कनं ईएसपीएनच्या ‘द क्रिकेट मंथली’शी बोलताना सांगितलं की, मालिका गमवायला कोणालाच आवडत नाही. ऑस्ट्रेलियात तर तुम्हाला सीरिज गमावलेली कधीच आवडणार नाही.'


भारतानं 2018-2019च्या मालिकेत उत्तम बॉलिंग आणि बॅटिंग केली होती, हे सत्य आम्ही नाकारू शकत नाही. यंदा आम्हाला चुका सुधारण्याची संधी आहे. आम्हाला आता चांगला खेळ केला पाहिजे, असं स्टार्क म्हणाला आहे.