एमएस धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. धोनी आजही अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी रोल मॉडेल आहे. माहीने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये देशवासियांना जल्लोष करण्याच्या अनेक संधी दिल्या. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. फिटनेससाठीही अव्वल असणारा एमएस धोनी कमाईच्या बाबतीतही अनेक क्रिकेटपटूंच्या पुढे आहे.
धोनी रांचीसारख्या छोट्या शहरातून आला असला तरी त्याची स्वप्न मोठी होती, त्यामुळेच त्याने टीम इंडियात स्थान मिळवलं आणि मग तो कर्णधार झाला. आपल्या नेतृत्वात धोनीने भारताला वनडे आणि टी-20 वर्ल्ड कप जिंकवला. आज धोनीकडे अनेक गाड्या, आलिशान घर आणि फार्म हाऊस आहे. एवढच नाही तर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.
सीए नॉलेजच्या एका रिपोर्टनुसार धोनीचची नेट वर्थ (Dhoni Net Worth) जवळपास 846 कोटी रुपये आहे. यावरून धोनी कमाईच्या बाबतीत इतर क्रिकेटपटूंपेक्षा किती पुढे आहे, हे लक्षात येतं. धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिकही बनवण्यात आला. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका केली होती.
धोनीने 2010 साली साक्षीसोबत लग्न केलं. साक्षी सिंग रावत उत्तराखंडची आहे. या दोघांना झिवा नावाची मुलगीही आहे. धोनीची पत्नी साक्षी इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. याशिवाय ती एका कंपनीची संचालकही आहे, ज्यात तिची 25 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय साक्षीची एक इंटरटेनमेंट कंपनीही असल्याचं सांगितलं जातं.