ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यातल्या शेवटच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. बुधवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी वनडे खेळवली जाणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झालेली ऑस्ट्रेलियाची टीम वनडे सीरिजमध्ये या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरेल. तर दुसरीकडे भारतीय टीमलाही वनडे सीरिज जिंकण्याची इच्छा असेल. या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियात बदल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारताचा डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटची 10 वर्षांनंतर वनडे टीममध्ये निवड झाली आहे. याआधी बांगलादेश दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचं 12 वर्षांनी कमबॅक झालं होतं. बांगलादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये जयदेव प्लेयिंग इलेव्हनमध्येही होता. आता वनडे सीरिजच्या अखेरच्या सामन्यात त्याला खेळायची संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2013 साली जयदेव उनाडकटने अखेरची वनडे मॅच खेळली होती, तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. युवराज सिंग आणि सुरेश रैनाही तेव्हा टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये होते. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार जयदेवसोबत टीममध्ये होते. वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना जयदेवचा वनडेमधला अखेरचा होता. त्यानंतर 10 वर्ष तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेसाठी प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? असा प्रश्न राहुल द्रविडला विचारण्यात आला, तेव्हा याबाबतचा निर्णय रोहित शर्मासोबत चर्चा करूनच घेतला जाईल, असं उत्तर राहुल द्रविडने दिलं. शेवटच्या वनडेमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या फास्ट बॉलरची निवड निश्चित आहे, तर हार्दिक पांड्याही फास्ट बॉलिंगला पर्याय म्हणून उपलब्ध आहे.