आयपीएल 2022 च्या लिलावासाठी (IPL Auction 2022) सगळ्या 10 टीम जोरदार तयारी करत आहेत. लिलावाआधी बीसीसीआयने (BCCI) 590 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यात 355 अनकॅप्ड आणि 228 कॅप्ड खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं असलं, तरीही त्यांच्यावर कोणतीच टीम बोली लावणार नाही. अशाच 5 खेळाडूंवर नजर टाकूया.
या यादीमध्ये पहिलं नाव चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) आहे. पुजाराने आयपीएल लिलावामध्ये त्याची बेस प्राईज 50 लाख रुपये ठेवली आहे, तरीही त्याला कोणतीच टीम विकत न घेण्याची शक्यता आहे. टेस्ट स्पेशलिस्ट असणं आणि खराब फॉर्म हे यामागचं प्रमुख कारण आहे. मागच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2021 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुजाराला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. पण संपूर्ण मोसम त्याला बेंचवर बसून राहावं लागलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही पुजाराला संघर्ष करावा लागला.
या यादीमध्ये दुसरं नाव फास्ट बॉलर इशांत शर्माचं (Ishant Sharma) आहे. इशांत मागच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये होता, पण यावेळी दिल्लीने त्याला रिटेन केलं नाही. लिलावामध्ये इशांतने त्याची बेस प्राईज 1.50 कोटी रुपये ठेवली आहे. सध्या इशांतची कामगिरी निराशाजनक होत आहे, तसंच त्याला फिटनेसच्या समस्येनेही भेडसावलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही इशांतला एकही टेस्ट खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मागच्या मोसमातही खराब फिटनेसमुळे इशांत फक्त 4 मॅच खेळू शकला होता आणि त्याला एकच विकेट मिळाली. 2019 आयपीएलमध्ये त्याने 13 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या होत्या.
भारताच्या वनडे आणि टी-20 टीममधून डच्चू मिळाल्यानंतर केदार जाधवला (Kedar Jadhav) आयपीएलमध्येही धमाका करता आला नाही. आयपीएल 2021 मध्ये केदार हैदराबादकडून खेळला होता, पण आता त्याला रिलीज करण्यात आलं आहे. यंदाच्या लिलावासाठी केदार जाधवने त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपये ठेवली आहे. जास्त बेस प्राईज, खराब फिटनेस आणि फॉर्ममुळे टीम केदारवर विश्वास दाखवण्याची शक्यता कमी आहे. मागच्या दोन आयपीएल मोसमात केदारने 10 इनिंगमध्ये 16.71 च्या सरासरीने फक्त 117 रन केले. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने मोठी खेळी केली नाही.
दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीरही (Imran Tahir) या लिलावात अनसोल्ड राहू शकतो. ताहिर मागच्या मोसमात चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्समध्ये होता. पण यंदाच्या लिलावाआधी सीएसकेने त्याला रिलीज केलं. ताहीरने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. जास्त बेस प्राईज, वाढलेलं वय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे ताहीरवर बोली लागणं सध्या तरी कठीण दिसत आहे. मागच्या दोन आयपीएलमध्ये ताहीरने फक्त 4 मॅच खेळल्या होत्या. त्याचं वयही आता 42 वर्ष झालं आहे. वयाचा परिणाम ताहीरच्या फिटनेसवरही होत आहे.
ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकवून देणारा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) यालाही यंदाच्या आयपीएल लिलावात धक्का बसू शकतो. फिंचने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. मागच्या मोसमातही फिंचने त्याची बेस प्राईज 1.5 कोटी रुपये ठेवली होती, तेव्हाही त्याला कोणत्याच टीमने विकत घेतलं नव्हतं. आयपीएलमध्ये फिंचची कामगिरी निराशाजनक झाली होती. आतापर्यंत फिंच आयपीएलमध्ये 6 टीमकडून खेळला. 87 सामन्यांमध्ये 25.38 च्या सरासरीने त्याने 2005 रन केले.