आयपीएल 2022 साठीचा (IPL 2022) लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. याआधी खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. लिलावासाठी भारताच्या 17 खेळाडूंनी आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे. यातल्या बहुतेक खेळाडूंना कमीत कमी ही रक्कम मिळेल पण यातल्या काही खेळाडूंवर बोली लागणंही कठीण आहे. भारताच्या सीनियर खेळाडूंनी मागच्या काही काळात चांगली कामगिरी केलेली नाही, त्यामुळे आयपीएल लिलावात त्यांच्या पदरी निराशा येऊ शकते.
सुरेश रैना (Suresh Raina) आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) यशामध्ये रैनाचं योगदान महत्त्वाचं आहे, पण आयपीएलच्या यंदाच्या लिलावात रैनावर दोन कोटी रुपयांची बोली लावायला टीम दहावेळा विचार करतील. मागच्या काही मोसमांमधली रैनाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 2021 च्या मोसमात रैनाने 12 मॅचमध्ये 17.77 च्या सरासरीने फक्त 160 रन केले. विरोधी टीमच्या बॉलरनी रैनावर बाऊन्सरचा मारा केला, ही त्याची आधीपासूनची कमजोरी आहे, त्यामुळे रैनावर बोली लागण्याची शक्यता कमी आहे.
आयपीएल 2021 मध्ये उमेश यादवने (Umesh Yadav) एकही मॅच खेळली नाही. उमेश यादव 2021 साली दिल्लीच्या टीममध्ये होता, पण आवेश खान, कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्किया हे तगडे फास्ट बॉलर असल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2019 साली उमेश आरसीबीकडून खेळला होता, तेव्हा त्याने बऱ्याच रन दिल्या होत्या. यावेळीही 2 कोटी रुपयांची बेस प्राईज असल्यामुळे उमेश यादवला विकत घेण्यात कोणती टीम फार इच्छुक नसेल.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 2021 साली कोलकात्याच्या टीममध्ये होता, पण लिलावाआधी केकेआरने त्याला रिटेन केलं नाही. गंभीरनंतर केकेआरने कार्तिकला टीमचं कर्णधार केलं होतं. 2020 आयपीएलच्या मध्यातच केकेआरने कार्तिककडून मॉर्गनकडे टीमचं नेतृत्व दिलं. आता तर टीमने मॉर्गनलाही रिटेन केलं नाही. कार्तिकने 2021 साली 17 मॅचमध्ये 22.30 च्या सरासरीने 223 रन केले होते. कार्तिकचा फॉर्म आणि वय बघता त्याच्यावरही 2 कोटी रुपयांची बोली लागणं जवळपास अशक्य आहे.