टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, त्यामुळे कांगारू पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन झाले. याआधी ऑस्ट्रेलियाने पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सगळ्याच खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Auction) या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागण्याची शक्यता आहे.
डेव्हिड वॉर्नरला (David Warner) आयपीएलच्या या मोसमात सनरायजर्स हैदराबादने पहिले कॅप्टन्सीवरून आणि नंतर टीममधून डच्चू दिला. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला. वॉर्नरने स्पर्धेत 289 रन केले. त्याच्या एकूण टी-20 करियरमध्ये त्याने 10 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. आयपीएल लिलावात वॉर्नरवर कोट्यवधींची बोली लागेल, तसंच त्याला एखाद्या टीमचा कॅप्टनही केलं जाऊ शकतं.
लेग स्पिनर एडम झम्पाने (Adam Zampa) टी-20 वर्ल्ड कपच्या 7 सामन्यांमध्ये 12 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. झम्पाची सरासरी 12 ची आणि इकोनॉमी रेट फक्त 5.81 चा राहिला. फायनलमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 26 रन दिले आणि एक विकेट मिळवली. झम्पाने त्याच्या टी-20 करियरमध्ये 222 विकेट पटकावल्या आहेत. तीनवेळा त्याला 4 पेक्षा जास्त विकेट मिळवता आल्या.
ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) टी-20 वर्ल्ड कपमध्ये फार खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याने बॅट आणि बॉलने प्रभावित केलं. आयपीएल 2021 मध्ये मॅक्सवेल विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये होता. मॅक्सवेलने टी-20 वर्ल्ड कपमध्ये फक्त 64 रन केले. फायनलमध्ये त्याने नाबाद 28 रनची खेळी केली. याशिवाय त्याने 2 विकेटही मिळवल्या.
फास्ट बॉलर जॉश हेजलवूडने (Josh Hazlewood) टी-20 वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये 16 च्या सरासरीने 11 विकेट मिळवल्या. फायनलमध्ये हेजलवूडने 16 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. 39 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या स्पर्धेत त्याचा इकोनॉमी रेटही 7.29 चा होता. आयपीएल 2021 मध्ये हेजलवूड सीएसकेच्या टीममध्ये होता. हेजलवूडने 64 टी-20 मध्ये 78 विकेट घेतल्या आहेत.
ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 4 इनिंगमध्ये 80 च्या सरासरीने 80 रन केले. नाबाद 40 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने ही महत्त्वाची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला रोमांचक विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने 138 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, याशिवाय तो मध्यमगती बॉलरही आहे. आयपीएल 2021 मध्ये स्टॉयनिस दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. याशिवाय पॅट कमिन्स, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, केन रिचर्डसन, डॅन ख्रिश्चन यांच्यावरही आयपीएल लिलावात मोठी बोली लागू शकते.