आयपीएल 2022 च्या (IPL 2022) तारखांची घोषणा झाली आहे. 26 एप्रिलपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर 29 मे रोजी आयपीएल फायनल खेळवली जाणार आहे. कोरोना आणि कठोर बायो-बबलच्या नियमांमुळे बीसीसीआयने प्रवास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहेत.
आयपीएलच्या लीग स्टेजच्या 70 पैकी 55 मॅच मुंबई, नवी मुंबईत तर 15 मॅच पुण्यात होतील. तर प्ले-ऑफ आणि फायनलच्या सामन्यांची अजून घोषणा झाली नसली, तरी हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये व्हायची शक्यता आहे. लीग स्टेजचे सामने मुंबई-पुण्यात होणार असल्यामुळे मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मात्र दिलासा मिळाला आहे, कारण या चारही स्टेडियममध्ये मुंबईची कामगिरी धमाकेदार झाली आहे.