

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातल्या अर्ध्या मॅच आता झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे अनेक युवा भारतीय खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवली आहे. यामध्ये अंडर-19 टीमचा कर्णधार प्रियम गर्ग, जम्मू-काश्मीरचा अब्दुल समद, फास्ट बॉलर कार्तिक त्यागी, लेग स्पिनर रवी बिष्णोई यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही त्यांना अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही. हे खेळाडू स्वत:च्या जीवावर मॅच जिंकवून देऊ शकतात.


भारताच्या अंडर-19 टीममध्ये असलेल्या इशान पोरेल याला पंजाबने अजून एकही संधी दिलेली नाही. पोरेलने बंगालच्या रणजी टीमसाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पोरेलने 16 विकेट घेतल्या. 2019-20 च्या रणजी मोसमात त्याने 6 मॅचमध्ये तब्बल 23 विकेट मिळवल्या होत्या. तरीही पंजाबने पोरेलला बेंचवर बसवलं आहे. इशान पोरेल 140 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करतो. संधी मिळाली तर पोरेल पराभवाच्या ट्रॅकवर असलेल्या पंजाबला विजयाच्या मार्गावर आणू शकतो.


इंग्लंडचा ओपनर असलेल्या टॉम बॅन्टनला कोलकाताने 1 कोटी रुपयांच्या किंमतीला विकत घेतलं. आक्रमक ओपनर असलेल्या बॅन्टनने मागच्या वर्षी टी-20 ब्लास्टमध्ये 549 रन केले होते. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट 161 पेक्षा जास्त होता. बॅन्टनने 51 बॉलमध्ये शतक केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही खेळला होता. कोलकात्याकडून खेळताना त्याला फक्त एकच संधी मिळाली आहे.


22 वर्षांचा लेग स्पिनर मयंक मार्कण्डेय या मोसमात राजस्थानच्या टीममध्ये आहे. 2018 सालच्या मोसमात 15 विकेट घेणाऱ्या मयंक मार्कण्डेयने या मोसमात अजून एकही मॅच खेळलेली नाही. राजस्थानकडे श्रेयस गोपाळ हा लेग स्पिनर आहे, पण त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे राजस्थान येत्या काही सामन्यांमध्ये मयंकला संधी देऊ शकते.