

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमधील संघांचा निर्णय झाला आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्क केलं आहे, मुंबईने 18 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे चेन्नई आणि दिल्ली आहे. तर 12 गुण मिळवून हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.


सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईला फायनलला पोहचण्याासाठी दोन संधी मिळतील. क्वालिफायर 1 मध्ये जिंकल्यास त्यांना थेट फायनलचे तिकिट मिळेल. जर पराभूत झाले तर त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळून पुन्हा फायनलला पोहचण्याची संधी असेल.


मुंबई पहिल्यांदा 2013 मध्ये क्वालिफायर 1 मध्ये खेळली होती. तेव्हा चेन्नईला पराभूत करून मुंबईने फायनलला धडक मारली. तर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून फायनलला प्रवेश केला. अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला 23 धावांनी पराभूत करून पहिले विजेतेपद पटकावले होते.


2015 मध्ये मुंबई पुन्हा क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईसोबतच लढली. यावेळी पुन्हा फायनलला दोन्ही संघ आमने सामने आले. यावेळी मुंबईने 41 धावांनी सामना जिंकून दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले होते.


क्वालिफायर 1 मध्ये खेळण्याची आणि विजेतेपद पटकावण्याची परंपरा मुंबईने 2017 च्या हंगामातही सुरू ठेवली. यावेळी क्वालिफायर 1 मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटसने 20 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये केकेआरला हारवून फायनल गाठली. मुंबई इंडियन्स क्वालिफायर 1 मधील पराभवाचा बदला घेत पुणे सुपरजायंटसवर रोमहर्षक विजय मिळवून तिसऱ्यांदा विजेता ठरले.


2010 मध्येही त्यांनी टॉप 4 संघात स्थान मिळवलं होतं. त्यावेळी सेमीफायनल आणि तिसऱ्या स्थानासाठी प्लेऑफ सामने खेळले जात होते. तेव्हा सेमीफायनलला बेंगळुरुला पराभूत करणाऱ्या मुंबईला चेन्नईविरुद्ध मात्र जिंकता आले नव्हते.


मुंबईने पहिले स्थान मिळवून क्वालिफायर 1 खेळणार आहे. हीच गोष्ट त्यांच्या जेतेपदाची दावेदारी करत आहे. जेव्हा जेव्हा मुंबई क्वालिफायर 1 खेळली आहे तेव्हा त्यांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही त्यांना क्वालिफायर खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ते विजेतेपदाचा चौकार मारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.